छत्रपती संभाजीनगर येथे राज्य सरकारची मंत्रिमंडळ बैठक पार पडली. या बैठकीवर विरोधी पक्षाने सडकून टीका केली होती. २०१६ साली तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या घोषणांचं काय झालं? असा प्रश्न विरोधी पक्षानं उपस्थित केला होता. याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. जे स्वत: काही करत नाहीत, ते नाव ठेवण्याचं काम करतात. तुम्ही अडीच वर्षात काय केलं? अशी टीका देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांवर केली आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, “विरोधी पक्षाने बैठक होऊ नये, असा प्रयत्न केला. बैठकीतून काय मिळणार? असा सवाल उपस्थित केला. जे स्वत: काही करत नाहीत, ते नाव ठेवण्याचं काम करतात. तुम्ही अडीच वर्षात काय केलं?”
“२०१६ सालच्या बैठकीत ३१ निर्णय घेण्यात आले होते. २२ विषय अवगत तर काही विषयांवर निर्देश झाले होते. ३१ विषयांचा आढावा २०१७ साली घेण्यात आला. तेव्हा १० विषयांवरील कार्यवाही पूर्ण झाली. १५ विषयांवर कार्यवाही टप्प्यात होती. ६ विषयांवर कार्यवाही अपूर्ण होती. २०२३ मध्ये ३१ पैकी २३ विषय पूर्ण झाले आहेत. ७ प्रगतीपथावर, तर १ विषय उद्धव ठाकरे यांच्या काळात व्यपगत झाला आहे,” असं देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं.
“जालना सीड पार्कच्या डीपीआरला ठाकरे सरकारच्या काळात परवानगी देण्यात आली होती. मराठवाडा वॉटरग्रीड प्रकल्पाचा मुडदा पाडण्याचं काम ठाकरे सरकारनं केलं. त्यामुळे विरोधक कशाच्या आधारावर प्रश्न विचारतात माहिती नाही. वॉटर ग्रीडला मदत करण्यासाठी केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवला आहे,” अशी माहिती देवेंद्र फडणवीसांनी दिली.
हेही वाचा : “भाजपाकडूनच राम मंदिराला धोका”, असे का म्हणाले नाना पटोले? वाचा…
“रेशीम लागवडीला मान्यता, रसायन तंत्रज्ञान संस्थेला २०० एकर जमीन, महाराज सयाजीराव गायकवाड यांच्या खंडाचं प्रकाशन केलं, लोकनेते गोपीनाथराव मुंडे राष्ट्रीय ग्रामविकास योजनेची घोषणा केली. ती संस्था सुरू झाली. जात पडताळणीसाठी २१ अधीक्षक नेमण्यात आले आहेत. छत्रपती संभाजीनगर येथील कर्करोग रुग्णालयाला राज्य कर्करोग रुग्णालयाचा दर्जा देण्याचं काम केलं,” असेही देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं.