कर्नाटकात विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची एकहाती सत्ता आली आहे. काँग्रेसला कर्नाटकात १३५ जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे ‘दक्षिणेचे प्रवेशद्वार’ म्हणून ओळखले जाणारे महत्वाचं राज्य भाजपाला गमावावे लागलं आहे. यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपाला खडेबोल सुनावले आहेत. कर्नाटकातील विजय हा काँग्रेसचे यश असून, आमचं कोणीच वाकडं करू शकत नाही, असं समजणाऱ्या प्रवृत्तीचा पराभव आहे, असं राज ठाकरेंनी म्हटलं.
राज ठाकरे नेमकं काय म्हणाले?
“मागे एकदा माझ्या भाषणात म्हटलं होतं की, विरोधी पक्ष कधी जिंकत नाही. सत्ताधारी हरत असतात. हा स्वभावाचा आणि वागणुकीचा पराभव आहे. आमचं कोणीच वाकडं करू शकत नाही, असं समजणाऱ्या प्रवृत्तीचा पराभव आहे. जनतेचा कधीही गृहित धरू नका, हा त्यातील बोध आहे. सर्वांनीच त्यातून बोध घ्यावा,” अस राज ठाकरेंनी सांगितलं आहे. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
हेही वाचा : VIDEO : ‘सिल्व्हर ओक’वरील महाविकास आघाडीच्या बैठकीत काय चर्चा झाली? जयंत पाटील माहिती देत म्हणाले…
“आमचा निवडून येण्याचा रेट हा इतरांपेक्षा चांगला”
छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना फडणवीस म्हणाले, “आमच्या पराभवाचं विश्लेशण आम्ही करू. त्यासाठी आम्हाला कोणाची गरज नाही. भाजपा अनेक निवडणुका जिंकते, तर काहींत आमचा पराभव होतो. कोणीच अजय नाही. आमचा निवडून येण्याचा रेट हा इतरांपेक्षा चांगला आहे. यांचं कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर लोकांचा विश्वास आहे. कधी-कधी स्थानिक ठिकाणी अशा अडचणी तयार होतात. त्याचं विश्लेषण होईल,” असं फडणवीसांनी म्हटलं.
“यावर राज ठाकरे बोलतील का?”
मुंबई भाजपा अध्यक्ष आशीष शेलार यांनीही राज ठाकरेंना प्रत्युत्तर दिलं आहे. “घरात बसून स्वप्न बघितल्यावर स्वप्नातल्याच प्रतिक्रिया माणूस देऊ शकतो. जर कर्नाटकमध्ये राहुल गांधींच्या ‘भारत जोडो यात्रे’चा प्रभाव असेल, तर मग जालंधरमध्ये आम आदमी पक्षाचा विजय आणि काँग्रेसचा पराभव का झाला? जालंधरमध्ये राहुल गांधीच्या ‘भारत जोडो’ यात्रेचा प्रभाव नव्हता का? उत्तर प्रदेशमध्ये झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्येही भाजपाला घवघवीत यश मिळालं. मग तिथे ‘भारत जोडो यात्रे’चा प्रभाव नव्हता का? यावर राज ठाकरे बोलतील का?”, असा सवाल आशीष शेलार यांनी विचारला.
हेही वाचा : “संजय राऊतांनी मर्यादित राहावं अन्…”, भाजपा नेत्याचा ‘त्या’ विधानावरून इशारा
“राज ठाकरेंच्या प्रतिक्रियेला महत्त्व देत नाही”
“राज ठाकरे हे केवळ स्वत:चं अस्तित्व दाखवण्यासाठी वक्तव्य करतात. त्याला आम्ही फार महत्त्व देत नाही,” असा टोला आशीष शेलारांनी राज ठाकरेंना लगावला आहे.