भाजपबरोबर शिवसेना सत्तेत सहभागी असली, तरी सत्तेचा वाटा मिळत नसल्याने अस्वस्थ आहे. परंतु शिवसेनेमध्ये सत्ता सोडण्याची हिंमत नाही. केवळ जास्तीचा वाटा मिळावा, या साठी शिवसेनेला मुंबईत ताकद दाखवण्याची वेळ आली आहे, असा टोला लगावत दोन्ही पक्षांनी सुखाने नांदत सत्तेच्या माध्यमातून जनतेला आधार द्यावा, असा सल्लाही विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी दिला. जनतेने राष्ट्रवादी काँग्रेसवर विरोधी पक्षात बसण्याची जबाबदारी दिली असून विरोधकाचीच भूमिका पार पाडू. सत्तेत थेट सहभागी होणार नसल्याचे यापूर्वीच पक्ष नेतृत्वाने सांगितल्याचे स्पष्टीकरणही दिले.
मुंडे यांनी मंगळवारी पत्रकार बठकीत भाजप-शिवसेनेअंतर्गत सुरू असलेल्या वादावर घणाघाती हल्ला चढविला. जनतेने भाजप-सेनेला बहुमत दिल्याने युतीला सत्तेची संधी मिळाली. सत्तेत येऊन वर्ष होत आहे. मात्र, या सरकारकडून कोणतेही समाधानकारक काम झाले नाही. जनता वर्षभरात काय काम केले? याचा जाब विचारेल. त्यामुळे लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठी दोन्ही पक्षांनी भांडण सुरू केले आहे. भाजपबरोबर शिवसेना सत्तेत सहभागी असली, तरी सेनेच्या मंत्र्यांना फारसे अधिकार नसल्याने पाकिस्तानचे माजी परराष्ट्रमंत्री यांच्या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या निमित्त गाठून सेनेने आपली ताकद दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न केला आहे. मुंबईत सेनेला आपली ताकद दाखवण्याची वेळ यावी, यातच सर्व काही स्पष्ट होते.
शिवसेनेत सत्तेतून बाहेर पडण्याची हिंमत नाही, असे स्पष्ट करुन राष्ट्रवादी काँग्रेस नेतृत्वाने यापूर्वीच भाजपबरोबर थेट सत्तेत सहभागी होणार नसल्याचे जाहीर केले आहे. जनतेने राष्ट्रवादीला विरोधी पक्षात बसण्याची जबाबदारी दिली असल्याने ती पार पाडू, असेही एका प्रश्नाच्या उत्तरात मुंडे यांनी स्पष्ट केले. जि.प. अध्यक्ष विजयसिंह पंडित, डॉ. योगेश क्षीरसागर आदी उपस्थित होते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा