छत्रपती संभाजीनगर : बहिणीला विजयाची ओवाळणी द्यीयची आहे, अशा भावना बंधू तथा राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी रविवारी व्यक्त केल्या. बीड लोकसभा मतदारसंघाच्या भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडे यांचे बीडहून रविवारी दुपारी परळीत आगमन झाले. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आठवडाभरानंतर पंकजा मुंडे यांचे परळीत दाखल होताच फुलांचा वर्षांव करून जोरदार स्वागत करण्यात आले. या स्वागतावेळी धनंजय मुंडे यांनी या भावना व्यक्त केल्या.
तत्पूर्वी धनंजय मुंडे, पंकजा मुंडे व डॉ. प्रीतम मुंडे या तिन्ही भावंडांनी गोपीनाथगडावर जाऊन दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या समाधीचे एकत्रितपणे दर्शन घेतले. पंकजा आणि डॉ. प्रीतम मुंडे यांचे धनंजय मुंडे यांच्या पंढरी या निवासस्थानीही औक्षण करून स्वागत करण्यात आले. यावेळी धनंजय मुंडे यांच्या मातोश्री रुक्मिणबाई यांचे पंकजा व प्रीतम मुंडे यांनी आलिंगण देऊन आशीर्वाद घेतले. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पंकजा यांचा धनंजय मुंडे यांनी पराभव केला. त्यापूर्वीपासूनच दोन्ही कुटुंबीयांमध्ये दुरावा निर्माण झाला होता. मात्र, अलीकडच्या काळात राखी पौर्णिमेला मुंबईतील वरळी येथील निवासस्थानी जाऊन धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे व प्रीतम मुंडेंकडून राखी बांधून घेतली होती. राष्ट्रवादी काँग्रेस भाजप-शिवसेनेच्या सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर पंकजा मुंडे व धनंजय मुंडे यांच्यातील कटूताही कमी होत असल्याचा संदेश दोन्ही भावंडांनी वेगवेगळ्या कार्यक्रमांना एकत्रितपणे हजेरी लावून दिलेला आहे. दरम्यान, पंकजा मुंडे यांनी होळीनिमित्त बंजारा समाज बांधवांच्या तांडय़ावर जाऊन पारंपरिक वेशभूषा परिधान करून होळी नृत्यावर ठेका धरला.
हेही वाचा >>>वंचितच्या भूमिकेने औरंगाबादमध्ये ठाकरे गटात चलबिचल
‘त्या’ मराठा तरुणांविषयी तक्रार नाही – पंकजा मुंडे
पंकजा मुंडे या शनिवारी नारायण गडावर जाऊन दर्शन घेऊन परतत असताना त्यांच्या ताफ्यासमोर येत मराठा आरक्षणासाठी काही तरुणांनी काळे झेंडे दाखवले होते. एक मराठा, लाख मराठा, अशा घोषणाही दिल्या होत्या. या तरुणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहे. मात्र, पंकजा मुंडे यांनी संबंधित तरुणांविरुद्ध तक्रार नसल्याचे एक पत्र बीडच्या पोलीस अधीक्षकांना लिहिले आहे. बीड जिल्ह्यचे नेतत्व म्हणून माझी जबाबदारी असून आचारसंहितेचा भंग अथवा कायद्याचे उल्लंघन होत नसेल तर गुन्हे दाखल करण्यात येऊ नये, असे पंकजा मुंडे यांनी पत्रात म्हटले आहे. या पत्रावर भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांचीही स्वाक्षरी आहे.