छत्रपती संभाजीनगर : इतर मागासवर्गीय संवर्गातून मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीच्या अनुषंगाने प्रत्येक गावातून दोन उमेदवार उभे करण्याचे ठराव ग्रामपंचायतींमध्ये केले जात आहेत. निवडणुकीसाठी मोठ्या संख्येने उमेदवारी अर्ज दाखल झाल्यास काय करावे, याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी धाराशिवच्या जिल्हाधिकाऱ्यांनी राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना पत्र पाठवले आहे.

मोठ्या संख्येने उमेदवारी अर्ज दाखल केले गेले आणि मतपत्रिकेवर मतदान घ्यावे लागले तर मतपेट्याची संख्या, मनुष्यबळ, मतपत्रिकांची हाताळणी, त्यांची सुरक्षितता याबाबत मार्गदर्शन करावे, अशा आशयाचा मजकूर या अर्धशासकीय पत्रात आहे. धाराशिवचे जिल्हाधिकारी सचिन ओम्बासे यांनी हे पत्र राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांना पाठविले आहे. निवडणुकीतील संभाव्य अडचणींबाबत पहिल्यांदा एखाद्या अधिकाऱ्याने अशा प्रकारचे मार्गदर्शन मागविले आहे.

हेही वाचा >>>संभाजीनगरात भाजपचा हिंदुत्वावर भर, एमआयएएमच्या विरोधात अमित शहा आक्रमक

धाराशिव तालुक्यातील कारी आणि तुळजापूर तालुक्यातील सावरगाव येथील ग्रामपंचायतींनी अधिकाधिक उमेदवार निवडणुकीत उतरविण्याचे ठराव केले आहेत. त्यामुळे संभाव्य परिस्थितीची माहिती देण्यासाठी हे पत्र पाठवले असल्याचे जिल्हाधिकारी ओम्बासे यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले. अलीकडेच बीड जिल्ह्यात सकल मराठा आंदोलकांनी, २३४५ उमेदवार उभे करण्यात येतील, असे सांगितले होते. परभणी जिल्ह्यातही असे ठराव अनेक ग्रामपंचायतींनी केले आहेत. त्यामुळे निवडणुकीमध्ये अधिकाधिक उमेदवार उतरवून आरक्षण प्रश्न केंद्रीय पातळीवर चर्चेत आणण्याची तयारी सुरू आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी निर्माण होणाऱ्या संभाव्य अडचणींविषयी मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना कळविले आहे.

निधी संकलन…

आतापर्यंत गावातील मंदिर, सप्ताह आदींसाठी निधी जमविला जात असे. आता ‘एक निधी समाजासाठी’ असे आवाहन करण्यात आले असून उमेदवारीची अनामत रक्कम आणि इतर निवडणूक खर्चासाठी प्रत्येक उमेदवारासाठी ३० हजार रुपये जमवावेत, असे आवाहन करण्यात आले आहे. या मोहिमेसाठी मराठा समाजातूनच निधी जमवावा, अशा सूचनाही दिल्या जात आहेत.

मराठा आंदोलकांचे ‘मिशन एक हजार’

प्रत्येक लोकसभा मतदारसंघात किमान एक हजार उमेदवार उभे राहिल्यास निवडणुकाच घेता येऊ नयेत, अशी रणनीती ठरविण्यात आली असल्याचेही सांगण्यात येते. या मोहिमेला ‘मिशन एक हजार’ असे नावही देण्यात आले आहे. ‘उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या या अनोख्या आंदोलनास आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांनी ना पाठिंबा दिला आहे ना विरोध केला आहे. येत्या एक दोन दिवसांत भेट झाल्यानंतर त्यांच्याशी चर्चा करू’, असे मराठा आरक्षण आंदोलनात पहिल्या टप्प्यात सहभागी असणारे प्रदीप साळुंके यांनी सांगितले.

Story img Loader