छत्रपती संभाजीनगर : मित्रपक्ष आम्हाला महत्त्व देत नाही. लोकसभा निवडणुकीत ‘रिपाइं’ला दोन जागा दिल्या असत्या तर निवडून आणल्या असत्या. विधानसभा निवडणुकीतही न मागितलेल्या जागा देण्यात आल्या. त्यामुळे पक्षाला अधिकृत मान्यता मिळविण्यात अडचणी येत आहेत, अशी कबुली रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी दिली. साेमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूस जबाबदार पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई होत नसल्याबाबतही त्यांनी दलितांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, असे मत व्यक्त केले.

पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’चे उद्घाटन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले. या कार्यक्रमासाठी शहरात आले असता त्यांनी सुभेदारी विश्रामगृह येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ‘रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला व्यापक करण्यासाठी येत्या एक जून रोजी ठाणे येथे अधिवेशन होणार आहे. नागालँडमध्ये रिपाइंला मान्यता मिळाली आहे. त्यामुळे गाव पातळीवर पक्षाच्या शाखा स्थापन करून सर्व समाजाला लोकप्रतिनिधित्व द्यावे आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लढवाव्यात असा सल्ला आठवले यांनी कार्यकर्त्यांना दिला. गावागावांत पक्ष असला तरी निवडून येण्याची क्षमता नाही, असे आठवले म्हणाले.

महायुती चांगले काम करीत आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुतीने लाडक्या बहिणांना २१०० रुपये देण्याचे आश्वासन दिले होते. ते आश्वासन पाळण्याची गरज आहे. कारण दिल्ली सरकार महिलांना २५०० रुपये देत आहे, असे आठवले यांनी सांगितले. सुशीलकुमार शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांनी खासगी क्षेत्रात आरक्षण जाहीर केले होते. या निर्णयाची अंमलबजावणी महायुती सरकारने करण्याची गरज आहे. छत्रपती संभाजीनगर शहरातील पीपल्स एज्युकेशन सोसायटी संस्थेत नवीन इमारती बांधण्यासाठी ५०० कोटी रुपयांची मागणी केली आहे. तिथे वैद्यकीय महाविद्यालय सुरू करून वसतिगृह बांधण्याचे नियोजन आहे. उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या निर्णयानुसार मी पीईएसचा अध्यक्ष आहे. तिथल्या प्राचार्य आणि इतरांनी माझे म्हणणे ऐकावे, असे आठवले म्हणाले. बुद्ध गया येथील महाविहार मुक्तीचे आंदोलन सुरू आहे. त्यासाठी बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांची भेट घेणार असल्याची माहिती आठवले यांनी दिली. या वेळी बाबुराव कदम, मिलिंद शेळके, विजय मगरे, नागराज गायकवाड आदी उपस्थित होते.

छावा पाहून भावना भडकल्या

औरंगजेबाचा काळ ३०० वर्षांपूर्वीचा असून त्याची आठवण काढण्याचे कारण नाही. मुस्लिमांनीही आपण औरंगजेब आणि मुघलांशी संबंध नसल्याचे मान्य करावे. छत्रपती संभाजी महाराज यांची हत्या झाल्यानंतर वढू गावातील गोविंद महार याने त्यांच्या शरीराचे अवयव एकत्र आणून अंत्यविधी केला होता. औरंगजेब क्रूर होता मात्र त्याची कबर पाडण्याला आमचा विरोध आहे. छावा चित्रपट पाहून लोकांच्या भावना भडकल्या आहेत. पण, सर्वांनी शांतता पाळून ऐक्य टिकवावे, असे आठवले म्हणाले.

Story img Loader