छत्रपती संभाजीनगर – ओडिसातील गोपालपूर येथील भारतीय प्राणी सर्वेक्षणातील शास्त्रज्ञानांना ‘सर्प-ईल’ प्रजातीमधील नवीन मासा आढळून आला आहे. अभ्यासाअंती ‘ओफिचथस सूर्याई असे या नवीन प्रजातीचे नाव दिले असून ते ओडिसा राज्य मत्स्य विभागाचे माजी सहसंचालक सूर्यकुमार मोहंती यांच्या सन्मानार्थ देण्यात आले आहे. या संशोधनाचा पूर्ण आढावा ‘बुलेटीन ऑफ मरीन सायन्स’ च्या ताज्या आवृतीत प्रसिद्ध झाला आहे.
ओडिसामधील बालासोर जिल्ह्यातील सुवर्णरेखा नदी, जगतसिंगपूर जिल्ह्यातील पारादीप आणि गंजम जिल्ह्यातील सुनारपूर जवळील बहुदा नदीतून मत्स्य नमुन्याचा अभ्यास करून भारतीय प्राणी सर्वेक्षणच्या प्रयोगशाळेत डीएनएचा सखोल अभ्यास व इतर चाचण्यांच्या आधारे ओफिचथस सूर्याई ही नवीन प्रजाती असल्याचा निष्कर्षापर्यंत शास्त्रज्ञ पोहोचले आहेत.
हेही वाचा – राज्यभरात उद्यापासून पोलीस भरती
या पूर्वीही या प्रकारातील काही नवीन प्रजातींचा शोध ओडिसा व तमिळनाडूच्या समुद्री किनाऱ्यावर लागलेला आहे. या प्रकारातील प्रजाती निशाचर व मांसाहारी असून मुख्यतः लहान मासे व ऑक्टोपस खाऊन जगतात. सामान्यतः यांची लांबी सापाप्रमाणे १०० से.मी. तर कमाल लांबी २०० सें. मी आढळते. जगभरात या प्रकारातील ३६४ प्रजातींची आजपर्यंत नोंद झालेली आहे. ही नवीन प्रजाती त्याच्या जवळून संलग्न असणाऱ्या ओफिचथस अल्टिपेनीस, ओफिचथस ॲलेनी आणि ओफिचथस झोफिस्टियस सोबतच या वंशातील इतर सदस्यांपासून वेगळी असल्याची पुष्टी शास्त्रज्ञांनी केली आहे. यासाठी विविध परांची रचना व त्याचा उगम, दातांचे नमुने आदींचा अभ्यास केला गेला.
भारतीय प्राणी सर्वेक्षण (गोपालपूर) चे ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनिल महापात्रा हे या संशोधन चमूमधील एक सदस्य होते. यात डॉ. राजेश कुमार बेहरा, डॉ. सुबेंद्रकुमार मिश्रा व डॉ. स्मृतीरेखा आचार्य यांचाही समोवश होता. या संशोधनाचा पूर्ण आढावा ‘बुलेटीन ऑफ मरीन सायन्स’ च्या ताज्या आवृतीत प्रसिद्ध झाला आहे, अशी माहिती या क्षेत्रातील अभ्यास प्रा. डाॅ. विश्वास साखरे यांनी दिली.
हेही वाचा – Video : रील्स करताना कार दरीत कोसळून तरुणीचा मृत्यू
या पूर्वी या वंशातील ओफीचथस नेवीयस व ओफिचथस चिल्केन्सिस या प्रजातींचा शोध तमिळनाडू येथील किनाऱ्यावर झालेल्या संशोधनात लागलेला आहे. तर अलिकडे ‘ओफिचथस हायपोसॅगमॅट्स’ या नवीन प्रजातीची नोंद मेक्सिकोमध्ये झालेली आहे, असे डाॅ. साखरे यांनी सांगितले.