छत्रपती संभाजीनगर : धाराशिव जिल्ह्यातील गेल्या वर्षीच्या खरीप हंगामातील प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या नुकसानभरपाईची २९४ कोटी रुपयांची रक्कम वारंवार पत्रव्यवहार करूनही दिली जात नसल्याने जिल्हाधिकारी सचिन ओम्बासे यांनी भारतीय कृषी महाकंपनीची मुंबई येथील अॅक्सिस बँकेतील दोन खाती गोठविण्याचा आदेश दिला आहे.
अॅक्सिस बँकेच्या फोर्ट (मुंबई) येथील शाखा व्यवस्थापकांना जिल्हाधिकाऱ्यांनी पत्र पाठवले असून त्यात भारतीय कृषी महाकंपनीच्या जंगम मालमत्तेची माहिती देण्याची मागणी करण्यात आली आहे.
धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या भरपाईचे २९४ कोटी कृषी महाकंपनीने दिलेले नाहीत. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी बडगा उगारला आहे..
हेही वाचा >>> मंत्री अब्दुल सत्तार आणि खासदार हेमंत पाटील यांच्यात खडाजंगी
धाराशिव जिल्ह्यातील खरीप २०२२ च्या हंगामातील प्रधानमंत्री पीकविमा योजनेची नुकसानभरपाई अद्याप मिळालेली नाही. २९४ कोटी रुपयांचा पीकविमा न मिळाल्याने ती रक्कम भरण्याचा आदेश जिल्हास्तरावरून देण्यात आला. विभागीय तक्रार निवारण समितीच्या बैठकीतही ही रक्कम विमा कंपनीच्या खात्यातून जिल्हाधिकारी यांच्या खात्यात वळती करण्याबाबत निर्णय झाला. ऑगस्ट २०२३ मध्ये राज्यस्तरीय तक्रार निवारण समितीनेही रक्कम अदा करण्याच्या सूचना केल्या. मात्र, या तिन्ही टप्प्यांवरील निर्णयाला भारतीय कृषी महाकंपनीने गांभीर्याने घेतले नाही. विमा कंपनीकडून कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद मिळत नसल्याने २९ नोव्हेंबर, ११ डिसेंबर आणि २१ डिसेंबर २०२३ या तारखांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. या पत्रांनाही विमा कंपनीने उत्तर दिले नाही. त्यामुळे खाते गोठवण्याची कारवाई करण्यात आली आहे.
भारतीय कृषी विमा कंपनीचे कार्यालय मुंबईमध्ये आहे. पीकविम्याची रक्कम जास्त आहे आणि कंपनीच्या खात्यावरील रक्कम अत्यल्प आहे. त्यामुळे कंपनीच्या मालमत्तांची माहिती मागवण्यात आली आहे.
– सचिन ओम्बासे, जिल्हाधिकारी, धाराशिव
खात्यात फक्त सव्वाचार लाख रुपये..
धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांची पीक विम्याची रक्कम २९४ कोटी आठ लाख रुपये एवढी आहे, तर विमा कंपनीच्या खात्यात ३ जानेवारीपर्यंत चार लाख २० हजार ७२२ रुपये ६३ पैसे रक्कम शिल्लक असल्याचे बँकेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना कळविण्यात आले आहे. त्यामुळे वसुलीचा तिढा कायम आहे.