छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील प्रशासकीय इमारतीसमोरील आणि वनस्पतिशास्त्र विभागाच्या परिसरातील उपाहारगृहे मागील दोन महिन्यांपासून बंद आहेत. परिणामी विद्यार्थ्यांना साध्या चहासाठी दोन किलोमीटरची पायपीट करावी लागत आहे. चहा, नाश्ता, जेवण यासाठीही वेगवेगळ्या वेळेत यावे-जावे लागत असल्याने विद्यार्थ्यांमधून तीव्र नाराजीचा सूर ऐकू येत आहे. तर नॅकमध्ये श्रेयांक मिळालेला असताना उपाहारगृहे बंद असणे विद्यापीठाच्या प्रतिमेसाठी योग्य नसल्याचा आरोप विद्यार्थी संघटनांकडून करण्यात येत आहे.

विद्यापीठात मुलांची आणि मुलींची मिळून प्रत्येकी पाच, अशी दहा वसतिगृहे आहेत. प्रत्येक वसतिगृहात जवळपास शंभर खोल्या असून, त्यामध्ये प्रत्येकी दोन विद्यार्थी-विद्यार्थिनींची संख्या पाहता बाराशेवर आहे. वसतिगृहात पाण्याची व्यवस्था असली तरी यापूर्वी तेथे छोटेखानी एक उपाहारगृहही होते. परंतु अलीकडच्या काळात वसतिगृहातील उपाहारगृहेही बंद आहेत. याशिवाय मुख्य दोन मोठी उपाहारगृहे विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारतीसमोर आणि एक वनस्पतिशास्त्र विभागाच्या परिसरात आहे.

ही दोन्ही उपाहारगृहे २२ जानेवारीपासून बंद असल्याचे विद्यार्थी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. विद्यापीठाने पदवीदान समारंभ, आविष्कार व युवक महोत्सवासारख्या मोठ्या कार्यक्रमांमध्ये जेवण, नाश्त्याची व्यवस्था बाह्य यंत्रणांकडे दिल्यामुळे दोन्ही उपाहारगृह चालकांचे मासिक भाडे आणि नफ्यातले गणित बिघडल्याचे सांगितले जात आहे.

उपाहारगृहे बंद आणि बेगमपुरा मार्गातील फाटक बंद केल्यामुळे विद्यार्थ्यांना एक तर चालत किंवा दुचाकी करून जायचे म्हटले तर मुख्य प्रवेशद्वाराच्या मार्गाने नाश्ता, चहा, जेवणासाठी जावे लागत असल्याचे विद्यार्थी सांगतात. वेळ, पायपीटीमुळे शारीरिक ताण, यामुळे विद्यार्थी मेटाकुटीला आल्याचे चित्र विद्यापीठात दिसून येत आहे. विद्यापीठाने केवळ नॅकमध्ये श्रेयांक मिळवण्याच्या खटाटोपीतला भाग म्हणून उपाहारगृहे सुरू ठेवली होती.

डॉ. तुकाराम सराफ, भारतीय विद्यार्थी सेनेचे विद्यापीठप्रमुख

दोन्ही उपाहारगृहांमधील पदार्थांच्या दराबाबत अनेक तक्रारी आल्या होत्या. नव्याने निविदा मागवून व्यवस्थापन समितीच्या बैठकीत उपाहारगृह सुरू करण्याचा विषय मंजूर करून घ्यायचा आहे. व्यावसायिकता पाहणाऱ्यांपेक्षा सामाजिक उद्देश ठेवून काम करणाऱ्या बचतगट, सामाजिक संस्थेला उपाहारगृह चालवण्यास देण्याचा विचार सुरू आहे.

डॉ. प्रशांत अमृतकर, कुलसचिव

Story img Loader