छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील मध्यवर्ती ग्रंथालयाच्या तळघरात बुधवारी (दि.२५) सायंकाळी आलेल्या मोठ्या पावसामुळे पाणी शिरले. या घटनेनंतर विद्यापीठ प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली. कुलगुरू, कुलसचिवांसह विद्यापीठ प्रशासनातील इतर यंत्रणा पुस्तके वाचवण्यासाठी प्रयत्नात उतरली. अखेर मनपा अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले. अग्निशमन पथकाचा बंब मागविण्यात आला असून, तळघरात साठलेले पाणी काढण्याचे काम सुरू होते.

दरम्यान, विद्यापीठाचा अक्षम्य कारभार पुढे आला असून ग्रंथालयात पाणी शिरलेच कसे, पाणी शिरण्याएवढा मोठा पाऊस झाला आहे का, असे प्रश्न विद्यार्थी संघटनांकडून उपस्थित केले जात आहेत. विद्यापीठातील ग्रंथालयात पाणी शिरत असल्याचे कळताच संचालक डॉ. वैशाली खापर्डे यांच्यासह सुरक्षा कर्मचारी, ग्रंथालयातील कर्मचारी, विद्यार्थी यांनी पुस्तक वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले.

हेही वाचा : छत्रपती संभाजीनगर: गणेश मंडळांमधील वाद, तरुण अत्यवस्थ; मुलाच्या परिस्थितीस पोलीस कारणीभूत, पित्याचा आरोप

दरम्यान, विद्यापीठ परिसरात बुधवारी सायंकाळी पाचच्या दरम्यान जोराचा पाऊस सुरू झाला. यामुळे समोरील रस्त्यावर पाणी साचून ओवर फ्लो झालेले पाणी तळघरात शिरले. ग्रंथालय विभागाचे कर्मचाऱ्यांनी तात्काळ सुरक्षा व अग्नीमक दलाशी संपर्क साधून गाडी बोलावून घेतली. दरम्यान दोन हजार पुस्तके भिजण्यापासून वाचवण्यात यश आल्याचा दावा विद्यापीठ प्रशासनाने केला आहे.