|| सुहास सरदेशमुख
कमल कुंभार यांचा राष्ट्रपतींच्या हस्ते सत्कार
औरंगाबाद : उस्मानाबाद तालुक्यातील हिंगळवाडी ३८० उंबऱ्यांचं गाव. या गावातील दहावीपर्यंत शिकलेल्या कमल विष्णू कुंभार यांनी शून्यातून करार शेती करत बांगडय़ा विक्री, शेळीपालन, कुक्कुटपालन अशा व्यवसायांतून लाखोंची उलाढाल करताना तीन हजारांहून अधिक ग्रामीण महिलांना उद्योगप्रवण बनविले. स्वत: पायावर उभे राहत अनेकींना रोजगार देणाऱ्या कमलताईंना या वर्षीचा ‘नारीशक्ती’ पुरस्कार राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते जागतिक महिला दिनी प्रदान करण्यात आला.
बचत गट चळवळीतून जडणघडण झालेल्या कमलताईंनी त्यांच्या कामाच्या जोरावर इंडोनेशिया, अमेरिकेतील न्यूयॉर्क येथेही कार्यशाळा व पुरस्कारासाठी प्रवास केला. त्यांची ही भरारी सध्या उस्मानाबादसह राज्यात महिला विकास क्षेत्रात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये चर्चेचा विषय आहे. १९९९ साली कमल कुंभार यांनी संत गोरोबाकाका सखी बचत गट सुरू केला. तेव्हा त्याची बचत होती २० रुपये. पण त्यातून व्यवसाय करायचा हे ठरले. कमलताईंनी बांगडय़ांचा व्यवसाय सुरू केला. पुढे स्टेशनरी, कुक्कुटपालन असे व्यवसाय सुरू केले आणि व्यवसाय वाढवत नेले. केवळ एकटीने काम होणार नाही असे लक्षात आल्यानंतर त्यांनी गावोगावी महिलांनी व्यवसाय सुरू करावेत यासाठी प्रयत्न करायला सुरुवात केली. या काळात बचत गटाचे फेडरेशन बांधले. पुढे आरोग्य क्षेत्रातील सरकारी अधिकाऱ्यांनी त्यांना प्रशिक्षण दिले. त्या आशा कार्यकर्ती म्हणून काम करू लागल्या. या काळात ७० गावांतून वीज देयक वितरणाचे काम महिलांनी करावे यासाठी त्यांनी पुढाकार घेतला.
वीज देयक वितरणाच्या कंत्राटातून त्यांनी अनेक जणींना रोजगार दिला. पुढे २०१२ मध्ये त्यांनी ऊर्जासखीचे प्रशिक्षण घेतले. या काळात निर्धूर चुली, तयार शौचालये विक्री होत. या क्षेत्रातही त्यांनी काम केले. पुढे त्यांची ‘ सुपर सखी’ म्हणून नियुक्ती झाली. त्यातून त्या इंडोनेशियाच्या दौऱ्यावर गेल्या. पुढे २०१४ मध्ये उमेद नावाचा शासकीय कार्यक्रम सुरू झाला. त्यात लघु उद्योजिकांना प्रेरणा देणाऱ्या व्यवसाय सल्लागार म्हणून त्यांनी काम केले. पुढे तीन वर्षांनी उस्मानाबाद जिल्ह्यात दुष्काळ होता. या काळात कुक्कुटपालन, शेळीपालन व घोडेपालन हे व्यवसाय त्यांनी सुरू केले. या प्रकल्पासाठी लागणारी जमीन त्यांनी कराराने घेतली. दोन एकर शेतीतून त्यांनी केलेल्या प्रयोगातून अनेक जणींनी प्रेरणा घेऊन व्यवसाय सुरू केले. २०१७ या वर्षांत त्यांना पुरस्कार मिळाला. २९ ऑगस्ट २०१७ मध्ये निती आयोगाने त्यांच्या कामाची दखल घेतली. इंडिया बँकेने रोल मॉडेल म्हणून पुरस्कार देण्यात आला तर फिक्कीचा एक पुरस्कार त्यांना मिळाला.
कोविडकाळात महिलांचे उद्योग वाढविण्यासाठी खूप प्रयत्न केले. त्यामुळे तीन हजार जणींपर्यंत त्यांनी संपर्क केला. अनेक जणींना मदत केली. त्यामुळे त्यांना नारीशक्ती या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. हिंगळजवाडीसारख्या गावात नवरा व दोन महाविद्यालयात शिकणाऱ्या मुलांसह सुरू केलेल्या व्यावसायिकरणाच्या प्रक्रियेला चालना देणाऱ्या कमल कुंभार यांचे आता सर्वत्र कौतुक होत आहे.