फेमिन कायद्यातील निकषांपेक्षाही यंदा अत्यंत कमी पाऊस झाला आहे. देशातील ३९ टक्के भागाला दुष्काळाचे चटके बसत आहेत. ५० कोटींहून अधिक लोक या चटक्यांमुळे होरपळून निघत आहेत. तरी देखील केंद्र व राज्य सरकार दुष्काळाची औपचारिक घोषणा करण्याऐवजी चालढकल का करीत आहे, असा सवाल स्वराज्य अभियानचे प्रा. योगेंद्र यादव यांनी येथे केला. फडणवीस सरकारकडे दुष्काळासाठी पसे नसतील, तर किमान त्यांनी तसे तरी जाहीर करावे, असे आव्हानही यादव यांनी दिले.
सुराज्य अभियानांतर्गत कर्नाटक, तेलंगणा, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि हरियाणा या राज्यांत १४ दिवसांच्या संवेदना यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथील हॅलो मेडिकल फाउंडेशन या ठिकाणी शेतकऱ्यांशी संवाद साधण्यास प्रा. यादव आले होते. माध्यमांशी बोलताना त्यांनी सध्या शेतकरी व शेती सर्वात वाईट अवस्थेत आहे. अनेक प्रश्नांनी घेराव घातला आहे. अशा काळात शेतकरी संघटना शिल्लक नाहीत, ही अत्यंत खेदाची बाब असल्याचे नमूद केले. आता नवीन स्वरूपात ही शक्ती पुन्हा एकवटायला हवी. नव्या पिढीने जबाबदारी खांद्यावर घेऊन सशक्त संघटन निर्माण करायला हवे, असेही त्यांनी सांगितले.
देशात यंदा १४ टक्के कमी पाऊस झाला आहे. देशातील ४० टक्के भूभागावर सध्या दुष्काळ आहे. दुष्काळाची औपचारिक घोषणा करण्याची तारीखही आता उलटून गेली. वरील आकडेवारी औपचारिक घोषणा करण्यासाठी आवश्यक असलेल्या निकषांमध्ये बसणारी आहे, तरीही अजून केंद्र व राज्य सरकारने दुष्काळाची औपचारिक घोषणा का केली नाही, असा सवाल प्रा. यादव यांनी केला. दुष्काळ जाहीर करा अथवा दुष्काळ दूर करण्यासाठी पैसे नाहीत हे तरी जाहीर करा, असा चिमटाही त्यांनी काढला.
ही यात्रा राजकीय संघर्ष आंदोलन उभारण्यासाठी नव्हे तर देशावरील संकट समजून घेण्यासाठी आणि शेतकरी, शेतमजुरांना दिलासा देण्यासाठी आखली आहे. यात आपण कोणतेच ठोस आश्वासन देणार नाही. मात्र, देशातील दुष्काळग्रस्त लोकांचा आवाज मुंबई आणि दिल्लीच्या कानाकोपऱ्यापर्यंत नक्कीच पोहोचविणार असल्याचे त्यांनी सांगितले. देशाला महाराष्ट्र सरकारने मनरेगा हा रोजगाराची हमी देणारा सशक्त पर्याय दिला. मात्र, याच महाराष्ट्रात या योजनेचे तीन-तेरा झाले असल्याचे त्यांनी सांगितले. या वेळी सुभाष लोमटे, डॉ. शशिकांत अहंकारी, पन्नालाल सुराणा यांच्यासह परिसरातील शेतकरी उपस्थित होते.
‘शेतकरी आंदोलनाचा वारसा शून्य’!
ऐंशीच्या दशकातील शेतकरी संघटनांचे आंदोलन व सद्य:स्थितीवर भाष्य करीत महेंद्रसिंग टिकैत, नरटी गौडास्वामी आणि शरद जोशी यांनी निर्माण केलेल्या शेतकरी आंदोलनाचा वारसा आता शून्य झाला असल्याचे सांगितले. या सर्वानी उभे केलेले शेतकरी आंदोलन महत्त्वपूर्ण होते. मात्र, वर्तमानकाळात त्याचे अवशेष शिल्लक नसल्याचे त्यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा