मुलीच्या लग्नाची सोयरीक जुळली, पण दुष्काळी स्थितीने खर्चाची तजवीज होत नसल्याने लग्न मोडले अन् कुटुंबाला चिंतेने ग्रासले. अखेर मुलीनेच धीर खचलेल्या पित्याला सावरून धरताना गावातील इतरही मुलींना हिंमत दिली. दुष्काळी स्थितीत आपल्याही आई-वडिलांसमोर पशामुळे अडचण निर्माण होऊ नये, या साठी तब्बल २५ मुलींनी दुष्काळी वर्षांत लग्नच न करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाचे सरपंचासह गावकऱ्यांनीही स्वागत करून वारोळा तांडय़ावर ‘यंदा कर्तव्य नाही’ असे जाहीर केले.
बीड जिल्ह्यात सलग ४ वर्षांपासून दुष्काळी स्थितीमुळे शेतकरी आíथक अडचणीत सापडले आहेत. चालू वर्षांत शेतकरी आत्महत्यांचा आकडाही तीनशेच्या वर गेला. दोन महिन्यांपूर्वी परळी तालुक्यात तडोळी येथे मुलीचे लग्न आठ दिवसांवर असताना पशाची जमवाजमव करताना हतबल वधूपित्याने आत्महत्या केली. लातूरमध्येही एका मुलीने वडिलांकडे हुंडय़ासाठी पसे नसल्याच्या कारणावरून चिठ्ठी लिहून आत्महत्या केल्याची घटनाही ताजीच आहे. या घटनांची चर्चा इतर उपवर मुलींपर्यंत गेली. त्यातूनच आíथक स्थिती नाजूक असलेल्या कुटुंबांतील शिकलेल्या मुलींमध्ये लग्नाच्या खर्चावरून चिंता वाढली आहे. आपल्या लग्नाच्या खर्चापायी वडिलांनी टोकाचे पाऊल उचलले तर काय, असा भीतिदायक प्रश्न सर्वसामान्य कुटुंबांतील मुलींसमोर निर्माण झाला आहे. अशातच माजलगावपासून वीस किलोमीटर अंतरावरील दीड हजार लोकसंख्येच्या वारोळा तांडा येथेही काही दिवसांपूर्वी मुलीचा विवाह ठरला. मात्र, खर्चाचे पसे जमवू शकत नसल्याने लग्न मोडावे लागले. त्यामुळे मुलीच्या वडिलांसह कुटुंबीय चिंतेत होते. मात्र, या मुलीनेच वडिलांना धीर देत या चिंतेतून कुटुंबाला बाहेर काढले.
महाविद्यालयीन मुलींमध्येही याची चर्चा झाली. महाविद्यालयीन मुलींमध्ये आपल्याही कुटुंबात लग्नाच्या खर्चावरून आई-वडील अडचणीत येऊ शकतात, याची धास्ती बसली. त्यातून या वर्षी दुष्काळामुळे मुलींनी लग्नच न करण्याचा निर्णय घेतला. कुटुंबीयांशी चर्चा करून सर्व मुलींनी गावचे सरपंच तुकाराम चव्हाण यांना याची कल्पना दिली. त्यानंतर सर्व मुलींना एकत्रित भेटून सरपंच व गावकऱ्यांनी मुलींच्या भावना जाणून घेत त्यांच्या निर्णयाचे कौतुक केले. वारोळा तांडय़ावर ‘यंदा मुलींचे कर्तव्य नसल्याची’ घोषणा करून टाकली. दुष्काळी स्थितीत इच्छा असूनही लग्न पुढे ढकलण्याची वेळ मुलींवर आली.
तालखेड फाटय़ापासून दोन किलोमीटर अंतरावरील वारोळा तांडा या दीड हजार लोकवस्तीच्या ठिकाणी बहुतांशी अल्पभूधारक आणि ऊसतोडणी मजूर. तांडय़ावर जाण्यासाठी धड रस्ता नाही आणि पिण्याच्या पाण्यासाठी तब्बल चार किलोमीटर पायपीट करावी लागते. यंदा ७० टक्के लोक ऊसतोडणीसाठी बाहेरगावी गेले आहेत. तांडय़ावर फक्त वयोवृद्ध व तरुण मुलीच आहेत. महाविद्यालयात जाणाऱ्या मुलींची संख्या २० असून काही मुली ऊसतोडणीसाठी गेल्या आहेत, तर बहुसंख्येने असलेल्या लमाण समाजातील हुंडय़ाच्या पद्धतीत खर्चाचा मोठा भार आहे. शिक्षक असलेल्या मुलाला जवळपास ५ लाख रुपयांपर्यंत, तर पदवीधर मुलासाठी लाख ते दीड लाखापर्यंत हुंडय़ाची मागणी केली जाते. लग्नाचा खर्च वेगळाच. त्यामुळेच मुलीचे लग्नही आई-वडिलांसाठी मोठी खíचक बाब झाली आहे.
पैसा नाही, पाणी नाही; लग्न कसे करणार? – तुकाराम चव्हाण
दुष्काळामुळे पीकपाणी नाही. पिण्याच्या पाण्यासाठी चार किलोमीटर अंतरावर जावे लागते. अशा स्थितीत लग्नाचा खर्च करायचा कोठून? या चिंतेत सर्वच पालक आहेत. त्यातच काही पालकांनी मुलीच्या लग्नाच्या खर्चाच्या चिंतेतून आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या. या पाश्र्वभूमीवर तांडय़ावरील सुशिक्षित मुलींनी या वर्षी दुष्काळात लग्न न करण्याचा निर्णय घेतला. याचे गावकऱ्यांनी स्वागत केले, अशी माहिती सरपंच तुकाराम चव्हाण यांनी दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा