पावसाचा अंदाजही लागेनासा
‘टँकरवाडा’ अशी ओळख बनलेल्या मराठवाडय़ात येत्या चार-पाच दिवसांत पाऊस येण्याची शक्यता नसल्याची निरीक्षणे सी-डोपलर रडारमध्ये दिसून आली आहेत. दुसरीकडे कृत्रिम पावसाच्या प्रयोगाचे विमान दुरुस्तीसाठी बंगळूरला पाठविण्यात आले आहे. दुष्काळाचे आढावे, नेत्यांचे दौरे यात पहिल्यांदाच जुल ते सप्टेंबर दरम्यानचा टंचाई आराखडा तयार केला जाणार आहे. यामध्ये शेतकऱ्यांना थेट मदत कधी मिळेल, हा प्रश्न अनुत्तरीतच आहे. तिजोरी रिकामी करू, हवे तर कर्ज काढू, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले असले, तरी येत्या काही दिवसांत दिलासा मिळेल असे काहीच घडणार नसल्यासारखे वातावरण आहे. आता तर पावसाचा अंदाजही लागेनासा झाला आहे.
सी-डोपलर रडारच्या माध्यमातून शास्त्रज्ञांना २०० किलोमीटर परिघातील ढग निर्मिती दिसते. परतीचा पाऊस कधी सुरू होईल, याचा अंदाज घेतला जात आहे. मात्र, अजून मान्सूनचे ढगच दिसत नसल्याचे कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी मदत करणाऱ्या शास्त्रज्ञांचे मत आहे. शनिवारनंतर (दि. ५) काही हालचाल होते का, याकडे लक्ष आहे. मात्र, सध्या कृत्रिम पाऊस पाडता येईल, अशीही स्थिती निर्माण होत नसल्याचे सांगण्यात आले. गणपतीत पाऊस येतो, असे मानले जाते. त्याची हालचाल हवामानातून दिसते का, याचा शोध घेतला जात आहे. या आघाडीवर कोणतीही सकारात्मक बातमी नाही.
तीव्र दुष्काळाच्या पाश्र्वभूमीवर मंगळवारी उस्मानाबाद व लातूरमध्ये चारा छावणी सुरू झाली. मराठवाडय़ातील तीन जिल्ह्यांतून ३२ छावणीचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले. यात बीड १७, लातूर १० व उस्मानाबादमध्ये ५ चारा छावण्यांना परवानगी देण्यात आल्याचे उपायुक्त जितेंद्र पापळकर यांनी सांगितले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा