बिपीन देशपांडे
छत्रपती संभाजीनगर : राज्य परिवहन महामंडळामध्ये नव्याने रुजू झालेल्या महिला चालकांच्या हाती लाल परी सोपवण्याऐवजी बसमधील प्रवाशांचे तिकीट फाडण्याचे वाहकाचे कर्तव्य देण्यात आले आहे. पावसाळय़ाच्या कारणावरून त्यांना चालकपदाच्या कर्तव्यापासून दूर ठेवले जात आहे. विशेष म्हणजे महिला चालकांनी चार वर्षे रखडत चाललेले प्रशिक्षण अवघे सोळा रुपये रोज भत्ता घेऊन घेतले आहे. महाराष्ट्रातील पाच विभागांत सध्या ६५ महिला चालक १ ते ७ जूनदरम्यान रुजू झाल्याची माहिती आहे.
राज्य परिवहन महामंडळाच्या छत्रपती संभाजीनगर, नाशिक, पुणे, नागपूर, अमरावती या पाच विभागांत मिळून २१५ महिला कर्मचाऱ्यांना २०२० मध्ये चालकपदाचे प्रशिक्षण देण्याचा कार्यक्रम आखण्यात आला होता. एकूण ३८० दिवस, असा प्रशिक्षणाचा कार्यकाळ होता. याअंतर्गत एकूण तीन हजार ८०० किलोमीटर लाल परी चालवून घेतली जाणार होते. यामधून १५६ महिलांनी प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केल्यानंतर मार्चमध्येच करोना महामारीमुळे टाळेबंदी लागू झाली. दोन वर्षे करोनाचा प्रभाव कमी-अधिक प्रमाणात राहिला. त्यानंतर सहा महिन्यांपेक्षा अधिक काळ राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा संपही चालला होता. परिणामी महिला चालकांचे प्रशिक्षण रखडले. प्रशिक्षणातच महिला चालकांची चार वर्षे गेली. प्रशिक्षण काळात सोळा रुपये रोजनुसार पाचशे रुपये महिना तेवढा मिळायचा. मात्र, प्रशिक्षण घेतलेल्या बहुतांश महिला या दुष्काळी, आदिवासी भागातील आहेत. किंबहुना त्यांच्यासाठीच चालकपदाचे प्रशिक्षण देऊन त्यांना सेवेत संधी देण्याचा उद्देश असताना आता प्रशिक्षण पूर्ण होऊनही लाल परी चालवण्यापासून केवळ पावसाळा सुरू असल्याच्या कारणावरून दूर ठेवले जात असल्याचा प्रकार समोर येत आहे.
वरिष्ठांची नाराजी ओढवून कष्टाने मिळवलेल्या नोकरीत अडचण नको म्हणून रुजू झालेल्या चालक गप्प बसून वाहक म्हणूनही काम करताना दिसत आहेत. हाती लाल परीचे सारथ्य नसल्यामुळे घेतलेले प्रशिक्षण वाया जाते की काय, अशी चिंताही त्यांना सतावत आहे. आठवडय़ातून एकदा तरी कार्यशाळेत का होईना स्टेअिरग हाती द्यावे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.