तुर्किस्तान मधील इदगीर विद्यापीठ व डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ यांच्यात ‘मेवलाना एक्सचेंज प्रोग्राम’ ला मान्यता मिळाली आहे. या प्रकल्पांतर्गत दोन्ही विद्यापीठातील आठ संशोधकांना विद्यावेतन मिळणार आहे.
‘युनियन ऑफ युरोपियन युनिव्हर्सिटीज्’च्या धर्तीवर पूर्व अशियातील विद्यापीठांची ‘युनियन ऑफ ईस्टर्न युनिव्हर्सिटीज’ ही संघटना लवकरच अस्तित्वात येणार आहे, अशी माहिती सेंटर फॉर इंटरनॅशनल रिलेशन्सचे संचालक डॉ. यशवंत खिल्लारे यांनी दिली. कृषी, विज्ञान व तंत्रज्ञान या क्षेत्रात संशोधन करणाऱ्यांना विदेशात शिक्षण, संशोधनाची संधी मिळावी, या संदर्भात इदगीर विद्यापीठाकडे सन २०१३ मध्ये प्रस्ताव पाठविण्यात आला होता. या प्रस्तावास इदगीर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. इब्रााहिन यांनी मान्यता दिली आहे. कुलगुरू डॉ. बी. ए.चोपडे व कुलसचिव डॉ. महेंद्र सिरसाठ यांनी ‘युथ एक्सचेंज प्रोग्राम’ला मान्यता मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त केला.
१ जानेवारी २०१६ ते ३१ डिसेंबर २०२० असा पाच वर्षांसाठी हा प्रकल्प असणार आहे. या अंतर्गत पदव्युत्तर, पीएच.डी, पोस्ट डॉक्टरल रिसर्च स्टुडंट्स व प्राध्यापक अशा चार प्रवर्गातून मिळून आठ जणांना विद्यावेतन देण्यात येईल. तुर्किस्तानात इदगीर विद्यापीठातर्फे निवास, भोजनाची मोफत व्यवस्था करण्यात येईल. तसेच प्रती संशोधक प्रतिमाह ७५० लिरा (तुर्किस्तानचे चलन) एवढी रक्कमही देण्यात येईल. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात संशोधनासाठी येणाऱ्या या संशोधकांना शैक्षणिक शुल्क माफ असेल. ‘सेंटर ऑफ इंटरनॅशनल रिलेशन्स’च्या माध्यमातून ‘इरासम्स् प्लस’ व ‘इरासम्स् मुंडस्’ हे युरोपियन देशासोबतच्या प्रकल्पानंतर आता पूर्वेतील देशासोबत या पहिल्या प्रकल्पास मान्यता मिळाली आहे.

Story img Loader