छत्रपती संभाजीनगर : पैठण येथील संत एकनाथ महाराज यांचे चरित्र ब्रेल लिपीमध्ये उपलब्ध करून देण्यात आले आहे. महाराष्ट्रातील १०० अंध मुलांच्या शाळांना हे चरित्र विनामूल्य देण्यात येणार आहे. त्याचे प्रकाशन फाल्गुन सप्तमीच्या दिवशी महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत पैठण येथे करण्यात आले. ब्रेल लिपीतील पहिले संतचरित्र हे एकनाथ महाराजांवरील असल्याचा दावा करण्यात येत आहे.
एकनाथ महाराजांवरील संत चरित्र ब्रेल लिपीत आणण्याची संकल्पना कोकणातील हरणे बंदराजवळील हरणे गावात सर्वप्रथम आली. आज ती प्रत्यक्षात उतरली, असे नाथ वंशज योगिराज महाराज यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.
पैठणच्या शांतिब्रह्म प्रकाशनातर्फे आणि शांतिब्रह्म श्री एकनाथ महाराज मिशनच्या सहकार्याने हे संतचरित्र उपलब्ध करून देण्यात आले आहे. -योगिराज गोसावी महाराज, नाथ वंशज
आपल्या माहितीप्रमाणे हे ब्रेल लिपितील पहिले संतचरित्र एकनाथ महाराजांवरील आहे. -डॉ. सदानंद मोरे, ज्येष्ठ साहित्यिक