छत्रपती संभाजीनगर : विघटन न होणाऱ्या वस्तुंवरच्या सीमाशुल्क दरात २५ टक्क्यांपर्यंत वाढ करण्यात आल्यामुळे यंदा प्रचारासाठी लागणाऱ्या विशिष्ट प्रकारातील कापड, फ्लेक्सच्या (फलका) दरात वाढ झाली आहे. फ्लेक्ससाठीच्या कच्चा माल आयात केला जातो. परिणामी यंदा प्रचाराच्या दरामध्येही २५ टक्के वाढ झाली आहे. त्यातही १५ टक्के वाढ ही लोकसभेनंतरची आहे.
प्रचारातील फलकांसाठी (फ्लेक्स) वापरण्यात येणाऱ्या अनेक वस्तुंमध्ये कपड्यातील अनेक प्रकार आहेत. त्यातील स्टार मिलिया कपड्याचा प्रकार कोरियातून आयात होतो. हेच कापड बहुतांशवेळा फलक बनविण्यासाठी वापरला जाते. त्यामध्ये १८०, २२०, ३४० जाडी (जीएसएम) प्रकार असतात. इतरही कमी जाडीचे कपडे असतात. त्याच्यातील मायक्रॉन, जीएसएमनुसार (जाडी) विघटन प्रक्रियेतील अवलंबून असते. साधारणपणे २२० च्या प्रकारातील कापड प्रचाराताली फलकांसाठी वापरले जाते, असे व्यावसायिक अनुप भन्साली यांनी सांगितले. यंदा विधानसभा निवडणुकीत उमेदवारांसाठी प्रचार, जेवणावळी, वाहन आदी खर्चाची मर्यादा ४० लाखांची आहे.
हेही वाचा : इडीने छळले. सत्तेशी जुळले, धन फळफळले
लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान १० बाय १० च्या फलकाचा (बॅनर) दर एक हजार १०० ते एक हजार २०० रुपयांपर्यंत होता. आता त्याच आकारातील फलकाचा दर दीड हजारांवर आहे. प्रचाराच्या साहित्यातील मूळ वस्तुंवरील सीमाशुल्क वाढवण्यात आल्यामुळे दरांमध्येही वाढ झाली आहे. सध्याच्या निवडणुकीत प्रचाराच्या फलक आदी साहित्यांच्या दरामध्ये २५ टक्के वाढ झाली आहे.
अनुप भन्साली, व्यावसायिक.
झेंड्यांच्या कापडांचेही दर वाढले प्रत्येक पक्षांचे झेंडे, उपरणे तयार करण्यासाठी साधारणत: सॅटिन प्रकारातील कापडाचा वापर केला जातो. सॅटिनचे कापड हे सूरतवरून आणावे लागते. झेंड्यांच्या प्रकारातील कापड दरामध्ये कायम चढ-उतार होत असते. अलीकडेच कापडाच्या दरात वाढ झाली आहे.
प्रशांत काथार, व्यावसायिक.