वेध संयोजन समिती व ठाण्याच्या इन्स्टिटय़ूट फॉर सायकॉलॉजीकल हेल्थच्या वतीने रविवारी (दि. १० जानेवारी) रोजी दयानंद महाविद्यालयाच्या सभागृहात ‘देणे निसर्गाचे (गो ग्रीन)’ या विषयावरील वेध व्यवसाय परिषदेत देशातील पर्यावरण क्षेत्रात काम करणारे सहा दिग्गज लातूरकरांना भेटणार असल्याची माहिती संयोजक धनंजय कुलकर्णी व उत्तम होळीकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
लातुरातील वेधचे हे पाचवे वर्ष आहे. गेल्या चार वर्षांपासून दरवर्षी वेगळे सूत्र घेऊन विद्यार्थी व पालकांसमोर दिवसभर त्या क्षेत्रातील मान्यवरांची भेट उपस्थितांना करून दिली जाते. या वर्षी महाराष्ट्राला दुष्काळाचा मोठा चटका बसला आहे. प्रत्येकाच्या तोंडी पाणी, चारा हेच विषय आहेत. आपल्या देशात पर्यावरण क्षेत्रात सातत्याने काम करत आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या सहा दिग्गजांना या वर्षीच्या परिषदेत निमंत्रित करण्यात आले असून ज्येष्ठ मनोविकासतज्ज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी हे त्यांच्याशी संवाद साधणार आहेत.
जगातील पहिले व एकमेव मानवनिर्मिती जंगल उभे करणारे आसाम प्रांतातील जोरहाट विभागातील जाधव पायेंग हे येणार आहेत.  गेल्या ३६ वर्षांपासून अखंडपणे वृक्षारोपणात ते व्यस्त असतात. त्यांनी एकटय़ाने २ हजार २६५ हेक्टरवर जंगल उभे केले.
विज्ञान शाखेत अत्यंत प्रतिष्ठेच्या पदव्या घेऊन सायन्स फॉर सोसायटी या संस्थेची स्थापना करून शाश्वत पर्यायी ऊर्जास्रोताच्या विकास करणाऱ्या मराठवाडय़ाचे सुपुत्र डॉ. वैभव तिडके यांच्याशी या परिषदेत संवाद साधला जाणार आहे.
जलपुरुष म्हणून ज्यांची देशभर ओळख आहे त्या राजेंद्रसिंह राणा यांचे पुत्र मौलिक सिसोदिया यांनी जलस्रोतांना पुनर्जीवित करून त्याची साठवणूक करून राजस्थानच्या वाळवंटाला हिरवेगार करणाऱ्या तरुण भारत संघाचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून काम केले आहे. त्यांचीही ओळख या परिषदेत होणार आहे.
पर्यावरण ऱ्हास रोखण्यासाठी कृतिशील काम करणाऱ्या डॉ. अर्चना गोडबोले, घनकचरा व्यवस्थापन व उत्पादक कार्यासाठी पुनर्वापर करणाऱ्या निर्मला व नेहा कांदळगावकर, हिवरेबजार या गावाचा संपूर्ण कायापालट करणारे पोपटराव पवार हेही या परिषदेत सहभागी होणार आहेत. या परिषदेसाठी ८० रुपयांचे प्रवेशशुल्क ठेवण्यात आले असून शहरातील बँक ऑफ महाराष्ट्र, मनमंदिर आदी ठिकाणी प्रवेशिका उपलब्ध करण्यात आल्या आहेत.

Story img Loader