मुलांना लहान वयापासूनच वाचनाची गोडी लावली तर सुसंस्कृत पिढी घडेल. वाचनामुळे संयम व एकाग्रता वाढून माणूस प्रयोगशील बनतो. तरुण पिढीवर समजामाध्यमांचा प्रभाव असला, तरी पुस्तकेच सदैव ज्ञान व प्रेरणा देतात, असे सांगून पाण्याचा दुष्काळ कमी करण्यासाठी जलयुक्त शिवार योजना राबवत आहे. विचारांचा दुष्काळ कमी करण्यासाठी गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या वतीने गावागावात वाचकसमूह निर्माण करून वाचनसंस्कृती रुजविण्याचा प्रयत्न करण्याचा मानस पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी व्यक्त केला.
येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्यायभवन परिसरात सरकारच्या मराठी भाषा विभाग, राज्य साहित्य संस्कृती मंडळ, जिल्हा ग्रंथालयाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या बीड ग्रंथोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्री मुंडे यांच्या हस्ते झाले. जिल्हाधिकारी नवलकिशोर राम, मुख्य कार्यकारी अधिकारी नामदेव ननावरे, ग्रंथालय विभागाचे सहाय्यक संचालक अशोक गाडेकर, माहिती अधिकारी अनिल आलुलकर, मनीषा तोकले, रमेश पोकळे, सर्जेराव तांदळे आदी उपस्थित होते.
मंत्री मुंडे म्हणाल्या, परळीत माझी आई ग्रंथालयाची सभासद असल्याने लहानपणापासूनच आपणास वाचनाची आवड निर्माण झाली. याचा राजकारणात फायदा होत आहे. वाचनामुळे संयम व एकाग्रता वाढते. लहान वयात मुलांवर वाचनातून चांगले संस्कार रुजवून सकारात्मक विचारणसरणी दृढ होण्यास मदत होते, असेही त्यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी राम यांनी सध्याच्या काळात वाचन दुर्मिळ होत चालले आहे. सार्वजनिक माध्यमांचाच बोलबाला आहे. एक पुस्तक वाचले तरी माणसाच्या व्यक्तिमत्त्वात मोठा बदल होतो. पुस्तकातून माणसाला प्रेरणा मिळते. चांगला समाज घडण्यासाठी वाचन आवश्यक असल्याचे सांगितले. जिल्हा ग्रंथालय अधिकारी बी. एस. कातकडे यांनी  प्रास्ताविक केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा