निवडणूकीच्या काळात ईव्हीएम बाबत अनेक गैरसमज पसरवण्यात येतात, त्यामुळे तणाव निर्माण होण्याची शक्यता असते, मतदान झाल्या नंतर एखादा मतदार बाहेर येऊन इतर मतदारांमध्ये अपप्रचार पसरवण्याचा प्रयत्न करत असेल, त्यांच्याकडून लेखी तक्रार घेऊन, सर्वांच्या समक्ष मतदान केंद्रात त्याच्याकडून मतदान करवून घेणार, आणि व्हीव्हीपॅटवर पावतीद्वारे सत्यता पडताळून दाखवणार, व त्यानंतर संबंधिताविरुद्ध गुन्हा दाखल करणार, असे जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
मतदानाच्या दिवशी ईव्हीएमद्वारे होणाऱ्या मतदानासंदर्भात शंका उपस्थित करून लोकांमध्ये गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र आता व्हीव्हीपॅट मशीन वापरले जाणार आहे. मतदनाच्या दिवशी एखाद्या मतदाराने असे केल्यास आधी त्यांचे म्हणणे खोटे असल्याचे सर्वांसमक्ष सिद्ध करून दाखवणार, आणि त्यानंतरच त्यांच्यावर गुन्हा नोंदवणार. अशा गुन्ह्यात २ वर्षाच्या कैदेची शिक्षा कायद्यात असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. व्हीव्हीपॅट मशीन हे मतदाराचा गैरसमज होवू नये, यासाठी आहे. ईव्हीएम मशीनवर त्याने ज्या उमेदवाराला मत दिले, त्याच उमेदवाराच्या खात्यात ते जमा झाले, याचा विश्वास मतदाराला व्हावा, यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती केली जात आहे.
शहरातील सर्वच मतदार केंद्रांच्या परिसरात तसेच सरकारी कार्यालयांच्या आवारात हि पथके जावून नागरिकांना ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट यांचे प्रात्याक्षिक दाखवत आहेत. नागरिक स्वतः मतदान करून पडताळून पाहत आहेत. यावेळी कर्मचाऱ्यांकडून नागरिकांनी उपस्थित केलेल्या शंकांचे निरसन केले जात आहे. तसेच लोकसभा निवडणुकीसाठी किमान २१ हजार कर्मचारी लागणार असून लवकरच या कर्मचाऱ्यांना आदेशपत्र पाठवण्यात येईल. आपल्याकडे औरंगाबाद आणि जालना लोकसभेचा अर्धा भाग असा दीड मतदारसंघ आहे. एका मतदारसंघाला किमान १२ हजार कर्मचारी लागतील. तर जालन्यातील अध्र्या मतदारसंघाला ६ हजार असे एकूण १८ हजार कर्मचारी लागतील. शिवाय ३ हजार कर्मचारी राखीव असतील, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.