जलसंपदा विभागात सहायक कार्यकारी अभियंत्यांची पदे भरताना काही उमेदवार दोन विषयांत उत्तीर्ण झाले नसतानाही पात्र ठरविण्यात आले आहेत. ९६ पैकी २१ उमेदवार एक किंवा दोन विषयांत चक्क नापास झालेले आहेत. मात्र, पर्सेटाईल पद्धतीने एकूण गुणांमुळे त्यांना पात्र या श्रेणीत बसविण्यात आले आहे. या अनुषंगाने मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून तक्रार करण्यात आली आहे. पदभरतीच्या जाहिरातीत एकूण गुणांचा निकष असल्याने उमेदवारांना पात्र घोषित केले असले तरी काही उमदेवारांना चारपैकी दोन विषयांत २०० पैकी केवळ १० ते ३० गुण मिळाले आहेत.
जलसंपदा विभागाच्या वतीने सहायक कार्यकारी अभियंतापदासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फ त ११ व १२ जानेवारी २०१४ मध्ये परीक्षा घेण्यात आल्या होत्या. या परीक्षेसाठी वैकल्पिक प्रश्न, स्थापत्य अभियात्रिकी- १, स्थापत्य- २ व स्थापत्य अभियांत्रिकी- ३ असे चार विषय होते. प्रत्येक विषयाची परीक्षा २०० गुणांची होती. पर्सेटाईल पद्धतीने कमाल गुणांच्या एकतृतीयांश गुण किमान अर्हता मानले गेले. त्यानुसार चार विषयांसाठी अनुक्रमे ३३, ४७, ३५, ३३ किमान गुण ठरवण्यात आले. प्रत्येक विषयात उत्तीर्ण असणाऱ्या उमेदवारांची नियुक्ती करण्याऐवजी एकूण गुणांचा आधार गृहीत धरून उमेदवारांची निवड करण्यात आली. ९६ पैकी २१ उमेदवार एक किंवा दोन विषयांत किमान गुण मिळवूनही उत्तीर्ण झाले नाहीत. चार विषयांपैकी दोन विषयांत नापास असणाऱ्या उमेदवारांची संख्या दोन आहे. तर अन्य १९ उमेदवार एका विषयात अनुत्तीर्ण आहेत. विशेष म्हणजे या उमेदवारांना जलसंपदा विभागात रुजू करून घेण्यात आले असून त्यांच्या प्रशिक्षणासही सुरुवात झाली आहेत. सहायक कार्यकारी अभियंतापदास पदोन्नतीचा लाभ लवकर मिळत असल्याने अनेक अधिकारी धास्तावले आहेत. त्यातील काही अधिकाऱ्यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे तक्रारही केली आहे.

Story img Loader