दुष्काळाच्या मदतीबाबतच्या प्रस्तावाची शहानिशा करण्यास आलेले केंद्रीय पथक परतल्यानंतर मराठवाडय़ातील अधिकाऱ्यांनी किती मदत लागू शकते, याची आकडेमोड नव्याने सुरू केली आहे. या पूर्वी दिलेली आकडेवारी कृषी विभागाने तयार केली होती आणि त्या आधारे मदतीचा ४ हजार २ कोटी रुपयांचा प्रस्ताव सादर करण्यात आला. मात्र, आता नव्या निकषानुसार अधिक रक्कम लागू शकते, असा अंदाज आल्यानंतर पुन्हा एकदा महसूल यंत्रणा नव्याने आकडेमोड करू लागली आहे. प्रस्तावानंतरची ही आकडेमोड म्हणजे वरातीमागून घोडे असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.
राज्य सरकारने २१ जिल्ह्य़ांतील १५ हजार ७४७ गावांना दुष्काळासाठी म्हणून केंद्राने मदत करावी, अशी विनंती करणारे निवेदन नुकतेच पाठविले असून तो प्रस्ताव ४ हजार कोटी रुपयांचा होता. पाठविलेल्या प्रस्तावाची छाननी करण्यासाठी केंद्रातील १० वरिष्ठ अधिकारी मराठवाडय़ाच्या दौऱ्यावर येऊन गेले. मराठवाडय़ातील ८ जिल्ह्य़ांसाठी किती रक्कम लागणार, हे मात्र अजून निश्चित झालेले नाही. मदत वाटपासाठी निधीचा प्रस्ताव नव्याने जिल्हाधिकाऱ्यांकडून मागवण्यात आला असून आज दिवसभरात दोन जिल्ह्य़ांचे आकडे आलेच नव्हते. निकषानुसार कोरडवाहू पिकांसाठी हेक्टरी ६ हजार ८०० रुपये व फळबागांसाठी १३ हजार ९०० रुपये मदत मिळणे अपेक्षित आहे. कृषी विभागाकडून घेतलेली आकडेवारी आणि महसूल विभागाची आकडेवारी यात तफावत असल्याने ती पुन्हा पुन्हा तपासली जात आहे. केंद्र सरकारकडे मदत मागण्यापूर्वी संबंधित विभागाकडून आकडे न घेतल्यामुळे मदतीसाठीच्या निधीचे वरातीमागून घोडे धावत असल्याची चर्चा आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Aurangabad News (छत्रपती संभाजीनगर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Famine fund