‘कोणाच्या सांगण्यावरून आत्महत्या करीत नाही. कर्ज झाले आहे. ते फेडता येत नाही. मेहनत कूरनही घरच्यांची उपजीविका भागवू शकत नाही. मुलांचे शिक्षण थांबेल, अशी भीती वाटते. मरावे वाटत नव्हते, पण काही इलाज नाही म्हणून थोडीशी दारू पिऊन विष घेत आहे,’ असा उल्लेख सरकारला लिहिलेल्या चिठ्ठीत करून पैठण तालुक्यातील नवगाव येथील शेतकरी अप्पासाहेब घोडके या ५५ वर्षांच्या शेतकऱ्याने जीवनयात्रा संपविली. त्याच्या पश्चात पाच मुली व दोन मुले असा परिवार आहे.
दुष्काळाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. तसेच शेतकरी आत्महत्या आकडाही वाढत असल्याचे चित्र आहे. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत कधी मिळणार या प्रश्नाची संवेदनाही आता सरकापर्यंत पोहचत नाही का, असा सवाल केला जात आहे. पैठण तालुक्यातील अप्पासाहेब घोडके या शेतकऱ्यास साडेतीन एकर शेती. त्यात त्यांनी ऊस लावला होता. शेतीच्या उत्पन्नावर त्यांनी ४ मुलींचे लग्न केले. त्यात त्यांना आयसीआयसी बँकेचे १ लाख ८० हजार रुपये कर्ज झाले. त्यातच पत्नीचा हात मोडला. तिच्या दवाखान्यावरही बराच खर्च झाला. मुलगा शिवा यास १०वी मध्ये चांगले गुण मिळाले. मात्र, शिक्षणासाठी लागणारी रक्कम नसल्याने त्याने एका कंपनीत प्रतिदिन १५० रुपयावर मोलमजुरी केली. हाती काही लागत नसल्याने अप्पासाहेब घोडके वैतागले होते. बुधवारी त्यांनी विष पिऊन आत्महत्या केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा