नापिकी आणि दुष्काळाला कंटाळून आणखी एका शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची दुर्देवी घटना समोर आली आहे. बीड जिल्ह्यातील ३७ वर्षीय शेतकऱ्याने आपली जीवनयात्रा संपवली. कुंडलिक यांनी त्यांच्या शेतात कापूस, सोयाबीन आणि इतर पिके घेतली होती; परंतु माझ्या डोक्यावर खासगी बँकेचे कर्ज असून ते फेडण्यास असमर्थ असल्याने मी आत्महत्या करीत असल्याचे त्यांनी मृत्यूला कवटाळण्यापूर्वी लिहून ठेवलेल्या चिठ्ठीत म्हटले आहे. माझ्या मुलांचा आणि बायकोचा भावांनी सांभाळ करावा अशी विनंतीदेखील त्यांनी त्या चिठ्ठीत केली आहे.
बीड जिल्ह्यातील साळेगाव कोथळा येथील ३७ वर्षीय कुंडलिक देवराव गवळी या तरूण शेतकऱ्याने गळफास घेऊन मृत्यूला कवटाळले. दुष्काळ आणि नापिकीमुळे कुंडलिक कर्ज फेडू शकले नाहीत. कुंडलिक गवळी यांच्यावर बँकेचे कर्ज होते. सोमवारी रात्री शेतात झोपायला म्हणून ते गेले होते; पण सकाळी घरी न परतल्याने कुटुंबीयांनी त्यांचा शोध घ्यायला सुरुवात केली. तेव्हा शेतातील एका झाडाला कुंडलिक यांचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळून आला.