‘माझ्या मौतीला या,’ असे गावकऱ्यांना निमंत्रण देऊन जालना तालुक्यातील खरपुडी येथील शेषराव सखाराम शेजूळ या ४० वर्षीय शेतकऱ्याने अंगणातील लिंबाच्या झाडास गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली. गुरुवारी पहाटे चारच्या सुमारास हा धक्कादायक प्रकार घडला.
शेषराव शेजूळ आणि त्यांचा भाऊ या दोघांमध्ये मिळून तीन एकर शेतजमीन असून, तिच्यावर कर्ज आहे. दुष्काळी स्थितीत पीक आले नाही. मुलाच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला आणि मुलीचे लग्न कसे करावे, या विवंचनेत शेजूळ होते. बुधवारी रात्री वैफल्यग्रस्त अवस्थेत त्यांनी गावातील काही जणांना ‘माझ्या मौतीला या’ असे आमंत्रण दिले होते. काही जणांच्या ते पायाही पडले होते, असे ग्रामस्थांनी आमदार अर्जुन खोतकर यांना सांगितले. खोतकर, शिवसेना जिल्हाप्रमुख भास्कर आंबेकर, उपजिल्हाप्रमुख पंडित भुतेकर यांनी खरपुडी गावास भेट देऊन आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. त्यांनीच हा प्रकार जिल्हाधिकाऱ्यांच्या कानावर घातला.
आमदार खोतकर यांनी सांगितले, की गेल्या वर्षभरात जिल्हय़ात ८३ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. नवीन वर्षांत जानेवारीमध्येही सहासात शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. नापिकी व कर्जबाजारीपणामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. २०१५मध्ये ८३ शेतकरी आत्महत्या झाल्या. यातील ५१ आत्महत्येची प्रकरणेच शासकीय पातळीवर आर्थिक मदतीसाठी ग्राहय़ धरण्यात आली. या प्रकरणांत एकूण ५१ लाख रुपयांची मदत देण्यात आली. आत्महत्येचे एकही प्रकरण प्रशासकीय पातळीवर अधिकृतरीत्या अपात्र ठरविण्यात आले नाही. एकूण ३२ प्रकरणे चौकशीसाठी प्रलंबित ठेवण्यात आली. प्रकरणे प्रलंबित ठेवण्यामागे रासायनिक परीक्षण अहवाल अप्राप्त असल्याचे कारण दिले जात आहे. गेल्या जूनपासून ३२ प्रकरणांमध्ये व्हिसेरा तपासणीचा रासायनिक अहवालच मिळाला नाही. हा अहवाल तातडीने उपलब्ध होण्यासाठी व्यवस्था करण्याची आवश्यकता मुख्यमंत्र्यांकडे अलीकडच्या जालना दौऱ्यात शासकीय आढावा बैठकीत केली. एखादा कर्जबाजारी शेतकरी आपल्या अंत्ययात्रेस येण्याचे आमंत्रण गावकऱ्यांना देऊन स्वत:चे जीवन संपवतो, ही दुर्दैवी आणि मन विषण्ण करणारी बाब असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा