दुष्काळी स्थितीत अडचणीत सापडलेला शेतकरी सावकारकीच्या जाचाला बळी पडू लागल्याच्या घटना उघडकीस येऊ लागल्या आहेत. धारूर तालुक्यातील लक्ष्मण चव्हाण या शेतकऱ्याला सावकाराने थेट कर्नाटकात डांबून ठेवल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला असतानाच मानेवाडी येथील भरत माने या शेतकऱ्याला सावकारानेच विष पाजल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला. या प्रकरणी तक्रार दाखल झाली आहे.
पावसाअभावी जिल्ह्यात दुष्काळी स्थिती निर्माण झाल्याने अल्पभूधारक शेतकरी अडचणीत सापडले आहेत. कामासाठी परराज्यात जात आहेत, तर मोठय़ा प्रमाणावर कुटुंबे जगविण्यासाठी सावकाराकडून व्याजाने पसे घ्यावे लागत आहेत. शेतकऱ्यांच्या हतबलतेचा फायदा घेऊन मोठय़ा प्रमाणात व्याजाची आकारणी करून शेतकऱ्यांना लुटण्याची संधी सावकार साधत आहेत.
धारूर तालुक्यातील चोरंबा येथील शेतकरी लक्ष्मण चव्हाण यांनी दीड वर्षांपूर्वी घेतलेल्या कर्जाच्या व्याजासह दीड लाख रुपये वसुलीस सावकार दुंडाप्पा िलगारेड्डी (कर्नाटक) याने डांबून ठेवल्याचा गुन्हा दाखल झाला. वडवणी पोलिसांचे पथक बागलकोट येथे जाऊन आले. मात्र, शेतकऱ्याची सुटका करू शकले नाही.
दुसऱ्या घटनेत बीड तालुक्यातील चौसाळ्यापासून जवळच असलेल्या मानेवाडी येथील भरत माने या शेतकऱ्यालाही सावकाराने व्याजाच्या एक लाख रकमेसाठी विष पाजून जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप नातेवाईकांनी केला. पीडित शेतकऱ्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. लागोपाठ दोन घटनांनी जिल्ह्यात शेतकरी आíथक अडचणीतून सावकारकीच्या जाचाला बळी पडत असल्याचे दिसत आहे.

Story img Loader