शेतकऱ्यांचे कोरडय़ा विहिरीत उपोषण!
केंद्र सरकारने चालू वर्ष आंतरराष्ट्रीय कडधान्य वर्ष म्हणून जाहीर केले. मात्र, शेतकऱ्यांना पेरणीसाठी पतपुरवठय़ाचा पत्ता नाही. अशा वेळी पेरणीसाठी बियाणे व खते मोफत द्यावीत. तसेच मराठवाडय़ातील शेतकऱ्यांना खरीप पेरणीसाठी अनुदान द्यावे, या मागणीसाठी पूर्णा तालुक्यातील पांगरा गावच्या तुकाराम सदाशिव ढोणे या शेतकऱ्याने आपल्या शेतातील कोरडय़ा विहिरीत बेमुदत उपोषण सुरू केले आहे.
दरम्यान, नायब तहसीलदार जोशी यांनी ढोणे यांची भेट घेऊन आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. तथापि जिल्हाधिकारी येथे येऊन आपल्याला लेखी आश्वासन देणार नाहीत, तोवर आंदोलन मागे घेणार नसल्याचे ढोणे यांनी स्पष्ट केले. ढोणे यांच्यासह साहेबराव ढोणे, भुजंग ढोणे, बालाजी ढोणे, बाबू ढोणे, गजानन ढोणे व आत्माराम ढोणे हे शेतकरीही उपोषणात सहभागी झाले आहेत.
आपल्या स्वमालकीच्या शेतातील कोरडय़ा विहिरीत उपोषण आंदोलन करणाऱ्या शेतकरी तुकाराम ढोणे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवून लक्ष वेधले आहे. पत्रात त्यांनी मराठवाडय़ातील शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी बियाणे व खते मोफत अनुदानावर देण्याची मागणी केली आहे.
मराठवाडय़ात १९७२ पेक्षाही भीषण दुष्काळ पडला आहे. तीनही वष्रे पेरलेल्या पिकांतून बियाणे व खताचाही खर्च निघाला नाही. अशा स्थितीत शेतकऱ्यांच्या घरात खायला अन्न नाही, पिण्यास पाणी नाही. शेतकऱ्यांच्या मुला-मुलींना शिक्षण, तसेच विवाहासाठी पसा नाही. बँका पीककर्ज देत नाहीत. अशा वेळी शेतकऱ्यांना केवळ रेशनच्याच धान्यावर गुजराण करावी लागत आहे. सरकारने अनुदानावर मोफत बियाणे व खतवाटप करणे गरजेचे आहे, अशी मागणी पत्रात करण्यात आली आहे.
शेतकऱ्याला आत्महत्येच्या दुष्टचक्रातून वाचवण्यासाठी पंतप्रधानांसह केंद्रीय कृषिमंत्री, राज्याचे कृषिमंत्री, महसूलमंत्री, कृषी आयुक्त आदींनी दुष्काळग्रस्त मराठवाडय़ाची पाहणी करावी. जिल्हाधिकाऱ्यांना आदेश देऊन खरीप हंगामापूर्वी बियाणे व खतासाठी अनुदान द्यावे, अशी मागणी पत्रातून केली आहे. पांगरा ढोणे शिवारातील कोरडय़ा विहिरीत शेतकऱ्यांनी हे उपोषण सुरू केले आहे.

Story img Loader