बिपीन देशपांडे

छत्रपती संभाजीनगर : यंदा दुष्काळाची झळ बसलेल्या शेतकरी वर्गाला रब्बीचे नियोजन करण्याच्या चिंतेने ग्रासले असून, त्यासाठी अर्थपुरवठादार बिगर बँकिंग कंपन्यांकडे (एनबीएफसी) सोने-तारण ठेवून कर्ज मिळवण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. त्याचे प्रमाण सध्या ७० ते ८० टक्क्यांपर्यंत असून, दिवाळीनंतर त्यात वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

राज्यात बहुतांश भागांत दुष्काळी परिस्थिती आहे. सरकारने सुरुवातीला ४० तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केल्यानंतर त्यावर झालेली चौफेर टीका पाहून आणखी ९५९ महसुली मंडळांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर करण्यात आली आहे. दिवाळीसारखा वर्षांतला मोठा सण तोंडावर आला असताना अनेक शेतकऱ्यांच्या खिशात अजूनही दमडी नाही. सोयाबीनसारख्या पीक- विक्रीतून किंवा पीकविम्याची रक्कम येण्याचा मार्ग असला तरी त्यातून येणाऱ्या पैशातून रब्बीचे नियोजन करायचे की, दिवाळीचा सण साजरा करायचा, की उधारीवर आणलेल्या बी-बियाण्यांच्या दुकानदारांचा हिशोब पूर्ण करायचा की, मुलांचे शिक्षण, असे अनेक प्रश्न शेतकऱ्यांपुढे आहेत. ग्रामीण भागात डेंग्यूसारख्या आजाराने डोके वर काढल्याने उपचारावरही मोठा खर्च होत आहे. अशा सर्व परिस्थितीत आणि सरकारी बँका कर्जासाठी दारात उभे करत नसल्याने बिगर बँकिंग वित्तीय कंपन्यांकडे सोने-तारण ठेवून रब्बीचे नियोजन आणि दिवाळी सणाचा खर्च भागवण्यासाठी शेतकरी कर्ज घेताना दिसत आहे.

हेही वाचा >>> उपमुख्यमंत्री अजित पवार अमित शाह यांच्या भेटीला, आजारपणानंतर पहिलाच दिल्ली दौरा

सध्या शेतकऱ्यांचे बिगर बँकिंग वित्तीय कंपन्यांकडे कर्ज घेण्याचे प्रमाण ७० ते ८० टक्के असल्याची माहिती या क्षेत्रातील एका कंपनीचे व्यवस्थापक असलेले संतोष देशमुख यांनी दिली. दुष्काळी मदत, पीकविम्याची अग्रीम रक्कम मंजूर करण्याच्या संदर्भाने निर्णय झालेले असले तरी प्रत्यक्षात मदतीची रक्कम बँक खात्यावर जमा होईपर्यंत दिवाळीचा सण निघून जाईल, म्हणूनही काही शेतकऱ्यांवर खासगी वित्तीय कंपन्यांकडे सोने-तारण ठेवलेल्या पैशांतून सण साजरा करण्याची वेळ आली आहे.

 मराठवाडा कायम दुष्काळी भाग म्हणून ओळखला जात असल्याने या भागात अर्थपुरवठादार बिगर बँकिंग कंपन्यांचे (एनबीएफसी) जाळेही अलिकडच्या काळात विस्तारत गेले आहे. विशेषत: ग्रामीण भागांत अधिक कंपन्यांच्या शाखा वाढत जात आहेत. आजच्या परिस्थितीत ‘एनबीएफसी’अंतर्गत अर्थपुरवठादार बिगर बँकिंग कंपन्या २० ते २२ असल्या तरी इतरही अनेक लहान पतपुरवठादार संस्था सोने-तारण ठेवून कर्ज देण्यासाठी उतरलेल्या असून, त्यांची संख्या ८० च्या आसपास आणि दीडशे ते दोनशेंवर शाखा असल्याचे या क्षेत्रातील जाणकार सांगतात.

बिगर बँकिंग वित्तीय कंपन्यांचे कामकाज सरकारी नियमनानुसार चालते. रिझव्‍‌र्ह बँकांच्या दिशादर्शक तत्त्वांनुसार सोन्यावर ६५ टक्के कर्ज दिले जाते. बऱ्याच वेळा अनेक कंपन्या ७५ टक्क्यांपर्यंत कर्ज देतात. अर्ध्या तासापेक्षाही कमी वेळात ग्राहकांना कर्जाची रक्कम मिळते. त्यामुळे शेतकऱ्यांचा ओढा बिगर बँकिंग वित्तीय कंपन्यांकडे वाढला आहे. सध्या त्याचे प्रमाण ७० ते ८० टक्क्यांपर्यंत आहे. दिवाळीनंतर प्रमाण वाढेल. – संतोष देशमुख, व्यवस्थापक, बिगर बँकिंग वित्तीय कंपनी

Story img Loader