माहिती-तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात होणाऱ्या संशोधनाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदार्थ विज्ञान विभागाने केलेल्या नव्या संयुगामुळे नवी दिशा मिळण्याची शक्यता आहे. ‘लेड-बेरियम-स्ट्रॉशियम-टीटानेट’ (पीबीएसटी) या संयुगाचे पेटंट नुकतेच मिळाले असून या फेरो इलेक्ट्रिक संयुगामुळे विद्युतपुरवठा खंडित झाल्यानंतरही संगणकात साठवलेली माहिती कायम राहू शकते. अवकाश संशोधनातील या संयुगाचा वापर झाल्यास ऊर्जा निर्मितीच्या साधनांमध्ये अचूकता व दर्जा राखता येणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील सेवानिवृत्त प्रो. डॉ. जी. के. बिचिले व प्रो. डॉ. के. एम. जाधव  यांच्यासह संशोधक विद्यार्थ्यांनी संयुग बनविण्याच्या प्रक्रियेचे पेटंट मिळविले आहे.
पदार्थविज्ञान विभागात २००६ मध्ये हे संयुग बनविण्यात आले. त्याचे पेटंट मिळावे यासाठी २५ जानेवारी २०१० मध्ये अर्ज करण्यात आला होता. तत्पूर्वी या संयुगाचे विविध पातळ्यावर परीक्षण करण्यात आले. २ डिसेंबर २०१५ रोजी या संशोधनास पेटंट मिळाले. त्याची माहिती प्रो. जाधव आणि प्रो. बिचिले यांना देण्यात आली.
माहिती-तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात डायनामिक रँडम असेस मेमरी व स्टॅटिक रेंडम असेस मेमरी वापरल्यानंतर विद्युतप्रवाह खंडित झाल्यानंतर संगणकातील माहिती नष्ट होते. परंतु या नव्या संयुगामुळे वीजपुरवठा खंडित झाला तरी माहिती साठवली जाऊ शकते. या तंत्रज्ञानाचा अवकाश संशोधनातही वापर होऊ शकतो. संयुगाच्या वापरामुळे ऊर्जा निर्मितीच्या साधनांमध्ये स्थितीज व गतीज ऊर्जेचे रूपांतर अचूक पद्धतीने होते. त्यामुळे अचूकता आणि दर्जा राखण्यासाठी हे संयुग मैलाचा दगड ठरेल. डॉ. जी. के. बिचिले हे १९८३ मध्ये पदार्थविज्ञान विभागात रुजू झाले होते. २००५ ते २००७ दरम्यान त्यांनी विभागप्रमुखपदही भूषविले. त्यांचे २०० हून अधिक संशोधन लेख विविध संशोधन पत्रिकेत प्रसिद्ध झाले आहेत. पेटंट मिळविण्याच्या प्रक्रियेत संशोधक विद्यार्थी डॉ. पी. पी. बर्दापूरकर, डॉ. एस. एन. देसाई, प्रा. डॉ. नीलेश बर्डे व दीपक ठाकूर यांचे सहकार्य लाभले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा