पैठण तालुक्यातील एकतुनी येथील खुनाची घटना
औरंगाबाद : बाबाने आईचा गळ घोटला असल्याची साक्ष पाच वर्षीय मुलीने अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. एस. भीष्मा यांच्यासमोर दिली. न्यायालयाने ही साक्ष ग्राह्य़ धरून खून करणाऱ्या विलास घोडकेला आजन्म कारावासाची शिक्षा आणि ५० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
पठण तालुक्यातील एकतुनी येथे राहणाऱ्या विलास सर्जेराव घोडके (वय ३५) च्या दोन बायका मरण पावल्यामुळे रेणुकासोबत तिसरे लग्न केले. १२ मार्च २०१५ रोजी रेणुका आपल्या पाच वर्षांच्या सत्यवान नावाच्या मुलीला आणि तीन वर्षांच्या कुणालला घेऊन सलानी बाबाला गेली होती. त्या ठिकाणी पती विलासने पत्नीला बेदम मारहाण केली. त्यामुळे रेणुका माहेरी केणवाडी येथे गेली. दरम्यान गुढीपाडव्याच्या दिवशी रेणुका आपल्या दोन्ही मुलांना घेऊन परत सासरी नांदण्यास आली.
२५ मार्च २०१७ रोजी पत्नी रेणुका, दोन मुले, आई सुभद्राबाई असे घरात झोपले असताना मध्यरात्री विलासने रेणुकासोबत भांडण उकरून काढून तिला जिवे मारण्याची धमकी दिली. दरम्यान त्याने दोरीने तिचा गळा आवळल्यामुळे ती जोरात ओरडल्याने मुले आणि सुभद्राबाई जागी झाली. आई मदतीसाठी सरपंचाच्या घरी गेली. त्या वेळी विलासने पत्नी रेणुकाचा गळा आवळून घरातून पळून गेला. मृताची सासू-सुभद्राबाईने आपला मुलगा विलास घोडके विरोधात पाचोड पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून विलास विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. सहायक पोलीस निरीक्षक बी. एम. धबडगे यांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. न्यायालयातील सुनावणीदरम्यान, सहायक लोकअभियोक्ता मधुकर आहिर यांनी १२ साक्षीदारांचे जबाब नोंदविले. मुलगी सत्यवानची साक्ष महत्त्वाची ठरली.