कुटुंबाचा चरितार्थ चालविण्यासाठी हाताला काम मिळत नसल्याने कंटाळलेल्या पित्याने स्वत:च्या तीन लहान मुलांना विहिरीत फेकले व नंतर स्वत:ही विहिरीत उडी घेतली. यात दोन मुलांसह पित्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला, तर सुदैवानेच दहा वर्षांची मुलगी बचावली. जिल्ह्य़ातील कडोळी (तालुका सेनगाव) येथे शनिवारी दुपारी दोनच्या सुमारास हा दुर्दैवी प्रकार घडला.
कडोळी येथील महेंद्र बळीराम गुडदे हा शेतमजूर हाताला काम नसल्याने घरसंसार कसा चालवावा, या विवंचनेत होता. त्यातूनच दुपारी गोरेगाव शिवारातील ज्ञानबा खिल्लारी यांच्या शेतात असलेल्या विहिरीत मुलगा जय (वय ७), सुमित (वय ४) व भारती (वय १०) या तिघांना विहिरीत फेकले व स्वत: विहिरीत उडी घेतली. भारतीने विहिरीत पंपाच्या पाईपला पकडून धरल्यामुळेच ती बचावली. तिने आरडाओरड केल्यामुळेच शेतातील लोक धावले. मात्र, तोपर्यंत जय व सुमित, तसेच महेंद्र गुडदे या तिघांचा पाण्यात बुडाल्यामुळे मृत्यू झाला होता.