औरंगाबाद : सक्तवसुली संचालनालयाच्या भीतीने अथवा दडपणामुळे आमच्याकडे व भाजपकडे येण्याचे ‘पुण्यकाम’ करू नका, असा सल्ला देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संजय राऊत यांना ‘कर नाही तर डर कशाला’ असा तिरकस टोला लगावला.

संजय राऊत यांच्या घरावर सक्तवसुली संचालनालयाने रविवारी छापा टाकला. त्यामुळे राज्यात सुरू असणाऱ्या चर्चेबाबत याबाबत मुख्यमंत्र्यांना विचारण्यात आले की, ‘ईडी’ची भीती दाखवून शिंदे गटात व भाजपमध्ये येण्यासाठी दबाव टाकला जात आहे. यावर मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, ‘राऊत यांना कोणी बोलावले नाही. त्यांची केंद्रीय तपास यंत्रणांकडून चौकशी चालू आहे. त्यात त्यांचा दोष आहे की नाही, हे समजेल. राऊत स्वत:च ‘कर नाही तर डर कशाला’ असे म्हणायचे.  महाविकास आघाडीचे ते मोठे नेते होते. तुम्ही रोज सकाळी त्यांना टीव्हीवर दाखवत असत; पण आम्ही सुडाचे राजकारण करत नाही. तसे केले असते तर न्यायालयाने सरकारला फटकारले असते; पण तसे घडत नाही. त्यामुळे चौकशी हा स्वतंत्र विषय आहे; पण अशी भीतीमुळे आलेली माणसे आमच्याकडे नकोत. मी पुन्हा एकदा जाहीर आवाहन करतो आहे की, कोणाच्या मागे यंत्रणा लागली असेल तर आमच्याकडे व भाजपकडे येऊ नका.’ कोणावर तरी दबाव टाकून कोणालाही आमच्यात घेतलेले नाही. अर्जुन खोतकर यांचा प्रवेश या दबावातून असल्याची चर्चा सर्वत्र होती. मात्र अर्जुन असो वा कोणी असो, असे दबावाने कोणाला आमच्यात घेतले नाही, असेही शिंदे यांनी स्पष्ट केले.