बिपीन देशपांडे
औरंगाबाद : महाराष्ट्र-कर्नाटकमध्ये उद्धवलेल्या वादाने सीमा भागातील कारखान्यांवर गेलेले ऊसतोड कामगार अस्वस्थ आणि काहीसे भयभीत झालेले आहेत. कर्नाटकमध्ये जाणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या बस बंद केल्यामुळे ऐनवेळी कौटुंबिक, शैक्षणिक कारणासाठी गावी येण्याचा रस्ताच बंद झाला आहे. महाराष्ट्रात परतण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे.
लोकसत्ता लोकांकिका स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी खास विजापूर जिल्ह्यातील यादवाड येथून आलेला तरुण अमोल सानप यांनी कर्नाटकातून महाराष्ट्रात पोहोचण्यासाठी कराव्या लागलेल्या दिव्याबाबतची आपबीती सांगितली. अमोल सानप हा बीडच्या बलभीम महाविद्यालयाचा विद्यार्थी आणि ऊसतोड करणाऱ्या आई-वडिलांकडे गेलेला होता. स्पर्धेच्या निमित्ताने अमोल बुधवारी बीडकडे येण्यासाठी निघाला, तेव्हा महाराष्ट्रातून येणारी बस बंद असल्याचे त्याच्या लक्षात आले. भाषेमुळे मराठी असल्याचे कर्नाटकातील व्यक्तीला लक्षात आल्यानंतर त्यांचा बघण्याचा दृष्टिकोन बदलल्याची जाणीव होत असल्याचे अमोल याने सांगितले.
अशीच आपबीती विष्णु महादेव गवळी यानेही सांगितली. विष्णू हा कर्नाटकातील हुबळीहून आधी बीडमध्ये व गुरुवारी सकाळी औरंगाबादेत दाखल झाला. हुबळीतील साखर कारखान्यावरील ट्रॅक्टरवर चालक म्हणून काम करत असल्याचे विष्णूने सांगितले. सध्या सीमावादाचा तुरळक परिणाम जाणवू लागला आहे. आता मराठी माणूस म्हणून आपल्याकडे पाहण्याची कन्नडिगांची नजर बदललेली आहे.
शांतिवनचे संचालक दीपक नागरगोजे यांनी सांगितले, की कोल्हापूर, सोलापूरच्या सीमावर्ती भागात बऱ्यापैकी साखर कारखाने असल्याने अनेक ऊसतोड मजूर सध्या त्या परिसरात कामासाठी गेलेले आहेत. बीड जिल्ह्यातून साधारण २० ते २२ हजार ऊसतोड कामगार सीमाभागात असण्याची शक्यता आहे. वेगवेगळय़ा मुकादमाच्या माध्यमातून ते कर्नाटकात गेलेले असतील. बीड जिल्ह्यात साधारण सध्या ४ लाखांच्या आसपास ऊसतोड कामगार स्थलांतर करतात.
अमोल सानप यांनी सांगितले, की येतेवेळी कर्नाटकात आपल्या बसवर दगडफेक झाली. काहींना मारहाणही केली. येत्या दोन दिवसांत एसटी पूर्णपणे बंद होण्याची शक्यता आहे. ऊसतोड कामगार जर एखाद्याच्या शेतात चुकून पाय पडला तरी त्यांच्या भाषेत फरक पडला आहे. काही चांगले आहेत. मात्र, बरेच जण अंगावर धावून आल्यासारखे वागतात. ताजा अनुभव सांगायचे म्हटले तर एका एसटी चालकाकडून चुकून कट बसला. तर त्याच्या अंगावर धावून गेल्याचा प्रकार अगदी ताजा आहे.