छत्रपती संभाजीनगर – नागपूरमधील दंगलीत तीन पोलीस उपायुक्तांसह ३३ पोलीस आणि पाच नागरिक जखमी झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच ही माहिती माध्यमांना दिली. या घटनेने अवघे समाजमन अस्वस्थ झाले आणि जखमी पोलिसांना पाहून त्यांचे “खाकी”तील कर्तव्यबंधू-भगिनींनाही वेदनेची ‘ठेच’ पोहोचली. या वेदनेतूनच जालन्यातील एका महिला पोलीस निरीक्षकाच्या हातून समाजमनाला काही सांगू पाहणारे एक काव्य उमटले. विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकीपूर्वी काही काळ त्या महिला पोलीस निरीक्षकांनी नागपूर येथे कर्तव्यही बजावले होते.

“माझ्यावर उगारलेला एक दगड…

तुमच्या सभ्य आणि सुसंस्कृत जीवनावरचा खोल आघात,

वेळ आली आहे..

प्रत्येक सभ्य नागरिकाने एक पोलीस होण्याची…

अशा काही आेळी जालन्याच्या पोलीस प्रशिक्षणात पोलीस निरीक्षक असलेल्या राजेश्री आडे यांच्या काव्यात उमटलेल्या दिसतात. त्यांनी पोलीस आणि समाजाचे परस्परांशी पाण्यातील प्रतिबिंबासारखे एक   नाते असल्याचेही सांगितले.

माझ्यावर उगारलेला एक हात..

तुमच्या सरळमार्गी आयुष्याचा शेवट असतो..

ऐका..

हा पोलीस सदरक्षणाय खलनिग्रहणाय आहे..

तुमच्या मध्ये आम्ही,

आमच्या मध्ये तुम्ही आहात.. असे एक ना अनेक तुकडे, अंतरे या काव्यात असून, त्यामध्ये समाजाच्या अडचणीच्या काळात, कोणत्या जाती-धर्माचा आहे हे न पाहता पोलिसांचा ‘खाकी’ रंगच मदतीसाठी पुढे सरसावलेला दिसतो आहे, असा अर्थ सांगणाऱ्या आेळी आहेत.