सदस्यांच्या हेलिकॉप्टर सहलीमुळे लक्षवेधी ठरलेल्या परळी तालुक्यातील कन्हेरवाडीच्या सरपंचपदी प्रभावती फड यांची शुक्रवारी अविरोध निवड झाली. आईला सरपंच करून अडीच वर्षांसाठी गावची सत्ता मिळवण्यासाठी राष्ट्रीय समाज पक्षाच्या युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ फड यांनी आíथक ताकदीतून सरपंचपद मिळवण्याचे राजकीय कौशल्य सिद्ध केले. अडीच वर्षांच्या सरपंचपदासाठी जवळपास १५ लाख रुपये खर्च केल्याचे सांगितले जाते.
परळी तालुक्यातील कन्हेरवाडी गाव सुरुवातीपासूनच राजकीयदृष्टय़ा संवेदनशील राहिले. ११ सदस्य असलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत भाजपचे ३, १ अपक्ष व राष्ट्रवादीचे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या गटाचे ७ सदस्य निवडून आले. कुसुमबाई मुंडे सरपंच झाल्या. विधानसभा निवडणुकीपूर्वी उद्योजक रत्नाकर गुट्टे यांचे जावई राजाभाऊ फड यांनी राष्ट्रीय समाज पक्षात प्रवेश केल्यानंतर ग्रामपंचायतीच्या ४ सदस्यांचेही पक्षांतर झाले. दोन महिन्यांपूर्वी सरपंच कुसुम मुंडे यांनी राजीनामा दिल्यानंतर सरपंचपद मिळवण्यासाठी भाजप नेतृत्वानेही २ सदस्यांचा प्रवेश घडवून संख्याबळ वाढवल्याने सरपंचपदासाठी चुरस निर्माण झाली. राज्य पातळीवरील पद मिळाल्यामुळे आई प्रभावती फड यांना सरपंच करण्यासाठी आíथक ताकद पणाला लावली. एका प्रभागातून निवडून आलेले सावित्री रोडे व प्रसन्नजित रोडे हे सदस्य सोबत होतेच. महादेव कंडुकटले या सदस्याच्या जात प्रमाणपत्राचे प्रकरण न्यायालयात गेल्यानंतर हा सदस्यही फड यांच्या बाजूने आला. भाजपत प्रवेश केलेल्या कुसुम मुंडे यांच्यासह १ व अपक्ष असे ३ सदस्य गळाला लावले. मतदानासाठी सदस्यांना ‘मोठे दान’ मिळाल्यामुळे सदस्यांनीही खुशीने आपले हात धुवून घेतले. कोणत्याही स्थितीत दगाफटका होऊ नये, या साठी आठ दिवसांपूर्वी दोन आलिशान गाडय़ांमधून ७ सदस्यांची सहल सुरू झाली. सुरुवातीला औरंगाबाद, घृष्णेश्वर, देहू, आळंदीसह आठ दिवसांत शक्य तेवढय़ा देवस्थानांचे ‘दर्शन’ घडवून अखेरीस पुणे ते परळी हा दीड तासाचा हेलिकॉप्टरने हवाई प्रवासही सदस्यांनी अनुभवला.
शुक्रवारी दुपारी सरपंचपद निवडीसाठी प्रभावती फड यांचा एकच अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली. सदस्यांना सहलीसाठी एका हेलिकॉप्टरला साधारण चार ते साडेचार लाख रुपये भाडे लागते. दोन हेलिकॉप्टरचेच जवळपास दहा लाखांच्या आसपास खर्च झाल्याचे सांगितले जाते. आठ दिवस विविध देवस्थानांची आलिशान सफर व तीन सदस्यांना ‘दान’ असा जवळपास १५ लाखांचा भार अडीच वर्षांच्या सरपंचपदासाठी फड यांनी सोसला. हेलिकॉप्टरचा खर्च रासपने केल्याचा दावा फड यांनी केला असला, तरी एका ग्रामपंचायतीच्या सत्तेसाठी पक्ष इतका खर्च करेल का, हा प्रश्न अनुत्तरीत आहे.
अडीच वर्षांच्या सरपंचपदासाठी सदस्यांना पंधरा लाखांची सहल!
सदस्यांच्या हेलिकॉप्टर सहलीमुळे लक्षवेधी ठरलेल्या परळी तालुक्यातील कन्हेरवाडीच्या सरपंचपदी प्रभावती फड यांची शुक्रवारी अविरोध निवड झाली.
Written by बबन मिंडे
First published on: 12-09-2015 at 01:40 IST
Aurangabad News (छत्रपती संभाजीनगर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fifteen lakhs tour to member for one and half year sarpanch