छत्रपती संभाजीनगर : दासोपंतानी पासोडीसह गीतार्णव आणि पदार्णव हे ग्रंथ लिहिले. यातील गीतार्णव म्हणजे भगवत गीतेवरील ओवीबद्ध टीका. याचा ग्रंथाच्या १८ पैकी काही पाच अध्याय प्रकाशित तर उर्वरित अध्याय अप्रकाशित. या ग्रंथातील शब्दार्थ कोषाचा प्रकल्प मराठी राज्य विकास संस्थेने पूर्ण केला. हस्तलिखिते कोणती खरी, त्याच्या काही अन्य प्रती आहेत काय, त्यातील कोणती संहिता खरी, वेगवेगळ्या प्रतीमधील पाठभेद कोणते याचा अभ्यास सेवानिवृत्त प्राचार्य विद्यासागर पाटंगणकर यांनी हाती घेतला आहे.
गीतार्णव या ग्रंथातील १८ व्या अध्यायावर वा. ल. कुलकर्णी आणि समीक्षक सुधीर रसाळ यांनी काम केले होते. मूळ ग्रंथ मिळवून ते त्यांनी लिहून काढले. ती संहिता जशासतशी आहे की नाही हे तपासले. या अध्यायात जवळपास १६ हजारापेक्षा अधिक ओव्या आहेत. १६ व्या शतकातील ‘ गीतार्णव ’ ग्रंथातील पहिले दोन, १२ व १६ वा व १८ वा अध्याय प्रकाशित आहे. १३ वा अध्याय पूर्ण प्रकाशित नाही. त्यातील शब्दार्थांचा कोष २०२१ मध्ये मराठी राज्य विकास संस्थेने पूर्ण केला आहे. अनेक जुने शब्द त्यामुळे पुढे आले.
या ग्रंथाचा तिसरा आणि सातवा अध्याय सध्या उपलब्ध नाही. त्यामुळे मूळ प्रत शोधणे आणि त्यातील पाठभेदसह मूळ सिंहितेची पुनर्स्थापन करणे असा प्रकल्प आता हाती घेण्यात आला आहे.
मूळ प्रत आणि ती लिहून काढताना वा टंकलेखन करताना किंवा अनवधानाने झालेल्या चुकांची दुरुस्ती नोंदवणे असे या कामाचे स्वरुप असेल. ‘मूळ हस्तलिखिते आणि त्यातील पाठचिकित्सेचे काम कसे करायचे या विषयी मराठीत फारसे काम झाले नाही. मूळ हस्तलिखित कोणते गृहीत धरावे यावर नागपूरचे ज्येष्ठ समीक्षक म. रा. जोशी यांनी काम केले आहे. त्यांच्या कार्यशैलीचा आधार घेत हे काम केले जाणार आहे. या प्रकल्पाचे संपादक म्हणून विद्यासागर पाटंगणकर यांच्याबरोबर ज्ञानोबा मुंडे, जितेंद्र देशपांडे, वैशाली गोस्वामी, सु्प्रिया महाजन ही मंडळी काम करत आहेत.
१६ व्या शतकातील हस्तलिखितांमध्ये ‘ बकू जैसा ध्यान शिळ’ असा उल्लेख आहे. पुढे लिहिताना ‘बकू जै साध्यान शिळ’ असे लिहिले गेल्याने त्याचा अर्थच लागत नव्हता. शब्दांची अशी चुकीची फोड दूर केल्यानंतर याचे अर्थ समजणे सोपे जाते. हे काम आता मराठी राज्य विकास संस्थेने हाती घेतली आहे. याच काळात निर्फळ असा शब्दप्रयोगही वापरात हाेता.
भाषिक नियमांमध्ये नि नंतर वसर्ग येणे आवश्यक होते पण १६ व्या शतकात तो रफार देऊन लिहिला जात असे. हा शब्द आता ‘निष्फळ’ असा वापरला जातो. पण अशा प्रकारचा शब्द १६ शतकात वापरला गेला होता. अंवि या शब्दाचा अर्थ अंबा, कैरी किंवा आंबट या अर्थाने वापरला गेला आहे. तो भाषा विज्ञान आणि युक्तीवादाच्या आधारे शोधता येतो. असे काम आता गीतार्णवाच्या अंगाने करण्याचे ठरवले आहे. पुढील चार वर्षे हा प्रकल्प सुरू राहील, असे पाटंगणकर म्हणाले.