छत्रपती संभाजीनगर : जालना जिल्ह्यातील बांधकाम मजुराच्या पत्र्याच्या निवाऱ्यावर मालमोटारीतील वाळू उलथवल्यामुळे दबून पाच जणांचा मृत्यू झाल्याची घटना जाफराबाद तालुक्यातील पासोडी या गावी घडली. पासोडी येथे पुलाचे बांधकाम सुरू होते. सात जण या पत्र्याच्या निवाऱ्यामध्ये झोपले होते. पहाटे वाळूचा ट्रक पत्र्याच्या निवाऱ्यावर रिकामा केल्यामुळे पत्रे दबले. त्याखाली सात जण दबले गेले. यातील दोन मजुरांना वाचविण्यात आले. यामध्ये १३ वर्षाच्या मुलीचा व महिलेचा समावेश आहे. मृतांची नावे अद्याप समजू शकली नाहीत. हे मजूर जळगाव आणि संभाजीनगरचे असल्याचे सांगण्यात येत आहे. ही घटना पहाटे साडेचार वाचण्याच्या सुमारास घडली.
पुलाच्या कामासाठी गेलेल्या मजूरांच्या पत्र्याच्या शेडवर गाढ झोपेत असताना वाळूच्या टिप्परमधून वाळू रिकामी झाली. ही घटना कळताच पोलीसांसह स्थानिक ग्रामस्थ पोहचले. वाळू बाजूला करुन दोघांना वाचविण्यात यश आले. जालन्यातील जाफराबाद तालुक्यातील पासोडी चांडोळ रस्त्यावरील पुलाचे काम सुरू असताना ही घटना घडली. अपघात घडल्यानंतर स्थानिक रहिवाशांनी घटनास्थळी मोठी मदत केल्यामुळे दोघींना वाचविण्यात यश आले आहे. पोलिसांनी पंचानाम सुरू केला आहे.
या दुर्दैवी घटनेत गणेश काशिनाथ धनवई (वय ४०, गोळेगाव), भूषण गणेश धनवई (वय १६, गोळेगाव), सुनील समाधान सपकाळ (वय २०, पद्मावती), यांच्यासह अन्य दोन जणांचा मृत्यू झाला. गणेश धनवई आणि भूषण धनवई या बाप-लेकाचा यात मृत्यू झाल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.