छत्रपती संभाजीनगर : राज्याचे पणन, अल्पसंख्याक मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या संपर्क कार्यालयात गुरुवारी दुपारी पाच तरुणांनी डिझेल अंगावर ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. या पाच तरुणांपैकी एकाला छत्रपती संभाजीनगरमधील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पुढील उपचारासाठी हलवण्यात आले. आदिवासी कोळी समाजप्रश्नी आश्वासन देऊनही पाळले नसल्याचा आरोप करत तरुणांनी आत्मदहनाच्या प्रयत्नासारखे पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती पुढे येत आहे. राजू दांडगे, दीपक सूरडकर (उंडणगाव), रवींद्र इंगळे, सीताराम पाडळे, दयानंद शेवाळे, दिनेश तांबे, अशी आत्मदहन करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणांची नावे असून, यातील एकाला छत्रपतीस संभाजीनगरला हलवण्यात आले आहे, अशी माहिती सिल्लोड शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक शेषराव उदार यांनी दिली.

पाचपैकी दोन तरुणांनी विष प्राशन केल्याची चर्चा सुरू होती. मात्र, पोलीस निरीक्षक उदार यांनी विष प्राशन केले नसल्याचे स्पष्ट करून डिझेल त्यांच्या तोंडात उडाल्याने त्यांना त्रास होऊ लागल्याचे सांगितले. दरम्यान, घाटीचे अधिष्ठाता सुरेश हडबडे यांनी याप्रकरणी गुरुवारी सायंकाळपर्यंत कोणीही दाखल झाल्याची नोंद नव्हती, अशी माहिती दिली.

हेही वाचा >>>सिल्लोडमधील गोळेगाव ग्रामपंचायत समोरच मृत व्यक्तीचा अंत्यविधी

आदिवासी कोळी समाजाच्या वतीने यापूर्वी अल्पसंख्याक मंत्री सत्तार यांना निवेदन देऊन आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता. अल्पसंख्याक मंत्र्यांनी आश्वासन दिले होते की, आदिवासी कोळी समाजाचा मुख्य प्रश्न ‘आदिवासी कोळी मल्हार जमात’ वैधता प्रमाणपत्र मिळत नसल्याचा असून त्यामुळे समाजाचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी बैठक लावून तुमचा प्रश्न सोडवू. परंतु दिलेल्या तारखेपर्यंत समस्या न सोडवल्याने उपरोक्त पाच तरुणांनी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या कार्यालयात आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. यावेळी लोकांनी सावरल्याने पुढील मोठा अनर्थ टळला. पोलिसांनाही कळल्यानंतर शहर ठाण्याचे एक पथक घटनास्थळी दाखल झाले. तरुणांना रुग्णालयातही हलवले. मात्र, त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती आपल्याकडे आल्याचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक सुनील लांजेवार यांनी सांगितले.

या घटनेच्या संदर्भाने मंत्री अब्दुल सत्तार यांच्याशीही संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांचा फोन बंद येत होता. त्यांच्या एका स्वीय सहायकाशी संपर्क केला तेव्हा त्यांनी आपण मुंबईत असून, या घटनेची आपल्याला माहिती नसल्याचे सांगितले.