|| बिपीन देशपांडे
औरंगाबादेत दीड हजारांवर ‘रनर’
हॉटेलमध्ये जाऊन जेवण घेण्यापेक्षा तेच सवलतीच्या दरात घरपोच किंवा वसतिगृहापर्यंत मिळू लागले तर खवय्यांसाठी ती खास मेजवानीच ठरू लागली आहे. अशा जेवणाची पूर्तता करणाऱ्या फूड डिलिव्हरी कंपन्यांचा विस्तार झपाटय़ाने वाढू लागला आहे. त्यामध्ये युवक, तरुणांच्या हाताला काम मिळू लागले. औरंगाबादेत सध्या असे काम करणारे दीड हजारांवर तरुण (रनर) विशिष्ट पोशाखात आणि जेवण गरम ठेवण्यासाठीच्या खास पेटीसह दुचाकीवर फिरताना दिसत आहेत.
पडेगाव भागात राहणारा विलास मूळचा पठण तालुक्यातील. शेतकरी कुटुंबातला. वाणिज्य शाखेतून पदवीधर झालेला. पण हाती काम मात्र नव्हते. त्यात मराठवाडय़ात सर्वत्र भीषण दुष्काळ. शेतीतही काम नाही. ग्रामीण भागात पाण्याचेही दुíभक्ष्य. गावातीलच लोकांवरच शहरांच्या ठिकाणी स्थलांतरित होण्याची वेळ आलेली.
अशा परिस्थितीत ग्रामीण भागातून शहरात शिक्षण, नोकरीसाठी आलेल्या तरुणांना रिकामे बसणे परवडणारे नाही. त्यामुळे हाती जे काम पडेल ते स्वीकारण्याशिवाय गत्यंतर नाही. सध्याच्या ऑनलाइनच्या जमान्यात हॉटेलांमधील जेवण घरपोच देणाऱ्या कंपन्यांचे जाळे तयार झाले आणि बघता-बघता औरंगाबादेतही त्यांचा व्यवसाय विस्तार वाढला. मागील दोन-तीन महिन्यांत या व्यवसायाच्या माध्यमातून घरपोच जेवण काही सवलतीत मिळू लागले. यामुळे औरंगाबादकरांकडून ऑनलाइनद्वारे घरपोच जेवणाची मागणी वाढली.
विद्यार्थी-विद्यार्थिनीही वसतिगृहावर जेवण मागवू लागल्या आहेत. त्याची पूर्तता करण्यासाठी कंपनीला मनुष्यबळही वाढवावे लागले. तरुणांना हे काम खुणावू लागले. त्यात तासानुसार आणि अर्धवेळही हे काम करण्याची सोय, असे विलास सांगत होता.
या कामाच्या पद्धतीबाबत विलास सांगत होता, सकाळी ११ वाजता काम सुरू होते. रात्री ११ पर्यंत चालते. यातील आठ ते दहा तास काम होते. दिवसभरात ५०० ते ७०० रुपयांपर्यंतचा रोज पडतो. किंवा सहा दिवसांचे अडीच ते तीन हजार रुपये. त्यात पेट्रोल आपल्याच पैशांचे. ऑर्डरचाही परीघ पाच ते सात किलोमीटरच्या आतील. त्यामुळे पेट्रोलवर अधिक खर्च होण्याची चिंता नाही. कंपनीकडून विशिष्ट पेहराव, जेवण पोहोचवण्यासाठी खास पेटी मिळते. मोबाइल असाही प्रत्येकाकडे आहेच. अनेक तरुण सायंकाळी ६ ते रात्री अकरापर्यंत काम करतात. म्हणजे अर्धवेळही काम केले तर त्यालाही ६० रुपये तास किंवा तीन ते चार तासांचे अडीचशे ते साडेतीनशे रुपये मिळतात.
मूळचे वाहनचालक असलेले निकम सांगत होते, की अलिकडे हाताला दररोज काम मिळत नव्हते. ज्या दिवशी काम नाही, त्या दिवशी रिकामे बसण्याची वेळ. फूड डिलिव्हरी करणाऱ्या कंपन्यांबाबत ऐकले आणि करून पाहू म्हणून काम स्वीकारले. विशिष्ट अॅपवर जाऊन नोंदणी करतो आणि तासानुसार काम स्वीकारतो.
दुचाकीवर फिरून जेवणाची आलेली मागणी पूर्ण करायची. फारसा ताण नाही. पण बऱ्यापकी हाती पसे राहतात. कधी-कधी दिवसभर वाहन चालवल्यानंतर सायंकाळी हेही काम करून अधिकची कमाई करतो. विलास सांगत होता, की काही विद्यार्थीही हे काम स्वीकारत आहेत. औरंगाबादेत दीड हजारांवर तरुण सध्या वेगवेगळ्या चार ते पाच कंपन्यांच्या माध्यमातून काम करीत आहेत. दिवसभर भाडय़ाने रिक्षा घेऊन तो चालवणारेही रात्री हे काम करीत आहेत.
सकाळी महाविद्यालय, दुपारी काम
प्रकाश सांगतो, की काही कॉल सेंटर बंद पडले आहेत. त्यातून बेकारी पदरात पडलेल्या तरुणांनी हे फूड डिलिव्हरीच्या काम स्वीकारले. काही विद्यार्थी सकाळी महाविद्यालयात जातात आणि दुपारी चार-पाच नंतर रात्री अकरापर्यंत काम करतात. रूमचे भाडे, मेसची रक्कम देऊन हाती चार पैसे राहतील, एवढी कमाई होते. दुष्काळात सध्या हे काम तरी तरुणांना आधार वाटू लागले आहे.