लोकसत्ता प्रतिनिधी

छत्रपती संभाजीनगर : माजी आमदार सुभाष झांबड यांना अखेर पंधरा महिन्यांनंतर शुक्रवारी अटक करण्यात आली. दोनच दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने पोलिसांसमोर हजर राहण्याचे आदेश दिल्यानंतर झांबड हे स्वतःहून पोलिसांपुढे गेल्याची चर्चा शहरात होती. मात्र आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संभाजी पवार यांनी झांबड यांना सकाळी त्यांच्या घरातून अटक केल्याची माहिती दिली.

येथील अजिंठा अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेचे अध्यक्ष असून त्यांच्यावर व इतर संचालक, बँकेच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांवर ऑक्टोबर २०२३ मध्ये ९८ कोटी ४१ लाखांच्या अपहार प्रकरणी सिटी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. तेव्हापासून झांबड पोलिसांना हाती लागत नव्हते.

माजी आमदार सुभाष माणकचंद झांबड यांनी अटकपूर्व जामिनासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. तेथे दाखल केलेला विशेष अर्ज (स्पेशल लिव्ह पिटिशन) मात्र दोन दिवसांपूर्वी मागे घेतला. तत्पूर्वी झांबडच्या वतीने ज्येष्ठ विधिज्ञ मुकुल रोहतगी आणि सुधांशू जोशी यांनी सत्र न्यायालयात जामीन अर्ज करायचा असल्याने हा अर्ज मागे घेण्याची परवानगी द्यावी, अशी विनंती केली होती. सुनावणीवेळी न्या. पी. एस. नरसिम्हा आणि न्या. मनोज मिश्रा यांनी अर्ज मागे घेण्यास परवानगी दिली. सुभाष झांबड पोलिसांसमोर हजर झाले आणि त्यांनी पुन्हा जामीन अर्ज केल्यास संबंधित न्यायालयाने तात्काळ निर्णय घ्यावा, असे आदेश दिले.

माजी आमदार सुभाष झांबड अजिंठा अर्बन बँकेचे अध्यक्ष असून, बँकेमधील ९८ कोटी ४१ लाख व २१ कोटी रुपयांचा घोटाळा, असे दोन वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत. २१ कोटींचा दुसरा गुन्हा हा २०२४ मधील नोव्हेंबरमध्ये नोंदवण्यात आलेला आहे. पहिला गुन्हा दाखल झाल्यापासून सुभाष झांबड अटकपूर्व जामिनासाठी प्रयत्न करत आहेत. यापूर्वी जिल्हा व सत्र न्यायालाय आणि औरंगाबाद खंडपीठात झांबड यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे. त्यानंतर झांबड यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. मात्र, तेथे पोलिसांसमोर हजर झाले आणि पुन्हा जामिनासाठी अर्ज केल्यास त्यावर न्यायालयाने तत्काळ निर्णय घ्यावा, असे आदेश देण्यात आले आहेत. यानंतर पोलिसांनी झांबड यांना अटक करण्याची प्रक्रिया पूर्ण केली.

Story img Loader