जनतेची दिशाभूल करण्यासाठी कोणत्याही थराला जाण्याची तयारी असलेल्या फडणवीस सरकारने डाळीच्या साठेबाजांवर केलेल्या कारवाईत कोटय़वधींचा घोटाळा केला आहे. दुष्काळावर सक्षम उपाययोजना करण्यात हे सरकार अपयशी ठरले. या नापास सरकारचा बुरखा हिवाळी अधिवेशनात फाडू, असा इशारा काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी येथे दिला.
जिल्हा काँग्रेसच्या नवा मोंढा भागातील कार्यालयात सावंत व आमदार डी. पी. सावंत यांनी हिवाळी अधिवेशनाच्या पाश्र्वभूमीवर पत्रकारांशी संवाद साधला. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बी. आर. कदम यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. सावंत म्हणाले, की केंद्र व राज्यातील भाजपप्रणीत सरकार निवडक व्यापाऱ्यांचे हित पाहते आहे. डाळीच्या साठेबाजांवर यांनीच छापे टाकले. यांनीच व्यापाऱ्यांना चोर ठरवले, मग आता बाँड कसले लिहून घेता? दोषींना जेलमध्ये का टाकत नाही? डाळीचे धाडसत्र हे मोठे षडयंत्र असून यात कोटय़वधींचा घोटाळा झाला. या सरकारचा विरोधी पक्षांशी संवाद नाही. मुख्यमंत्र्यांनी दुष्काळी भागाचा दौरा केला; पण त्यातून विरोधकांना डावले. दुष्काळाच्या कोणत्याही उपाययोजना या सरकारकडे नाहीत. शेतकऱ्यांची थट्टा चालवली असून हा वर्ग आपला मतदार नाही, या भावनेने सरकार शेती व शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे पाहत असल्याची टीका सावंत यांनी केली.
फडणवीस सरकार सत्तेवर आल्याबरोबर त्यांनी आघाडी सरकारमधील मंत्र्यांबरोबर काम केलेल्या अधिकाऱ्यांना बदलले. त्यानंतरही मुख्यमंत्री म्हणतात, अधिकारी ऐकत नाहीत. हा पोरखेळ असून मुख्यमंत्र्यांचा प्रशासनावरच वचकच नाही. या सरकारमधील मंत्री कोणत्याही खात्याबद्दल मत प्रदर्शित करून मोकळे होत आहेत. आपल्या सरकारमधील कोणत्या मंत्र्याने कोणता निर्णय घेतला, हेसुद्धा मुख्यमंत्र्यांनाच माहिती नसते. जे निर्णय कॅबिनेटमध्ये घ्यायचे, ते कनिष्ठ पातळीवरच होत आहेत. साहजिकच सरकारच्या नौटंकीला जनता वैतागली असून हिवाळी अधिवेशनात सरकारच्या नाकीनऊ आणू, असा दावा करताना सरकारकडे कल्पना, समज व क्षमताही नसल्याची टीका सावंत यांनी केली.
अधिवेशनासंदर्भात प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होऊन सविस्तर चर्चा झाली असून अधिवेशनाच्या सुरुवातीलाच काँग्रेस शेतकऱ्यांचा ‘न भूतो..’ स्वरूपाचा मोर्चा काढणार आहे. संपूर्ण कर्जमुक्ती ही आमची प्रमुख मागणी असून वीजपुरवठा, अवास्तव विद्युत देयके यासह इतरही विषय मोर्चाच्या केंद्रस्थानी असतील, असे आमदार सावंत यांनी सांगितले.
डाळींच्या साठेबाजांवर कारवाईत कोटय़वधींचा घोटाळा – सावंत
जनतेची दिशाभूल करण्यासाठी कोणत्याही थराला जाण्याची तयारी असलेल्या फडणवीस सरकारने डाळीच्या साठेबाजांवर केलेल्या कारवाईत कोटय़वधींचा घोटाळा केला आहे.
Written by बबन मिंडे
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 20-11-2015 at 01:30 IST
Aurangabad News (छत्रपती संभाजीनगर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fraud in dal stock