निजामाच्या राजवटीत जुलमी रझाकाराच्या सनिकांशी दोन हात करणाऱ्या तुळजापूर तालुक्यातील सलगरा येथील स्वातंत्र्यसनिक शिवराम भरगंडे यांच्या निधनानंतर ५ वर्षांपासून पेन्शनसाठी सरकारी कार्यालयाचे उंबरठे झिजवणाऱ्या त्यांची पत्नी हिरकणाबाई यांना ‘लोकसत्ता’मुळे न्याय मिळाला आहे. पाच वर्षांपासून रखडलेले ४ लाख १६ हजार रुपयांचे निवृत्तिवेतन त्यांच्या बँक खात्यावर जमा झाले.
निजाम राजवटीत शिवराम भरगंडे हे नाव ऐकले तरी जुलमी रझाकाराच्या सनिकांचा थरकाप व्हायचा. या लढवय्याने कित्येकदा रझाकारांना सळो की पळो करून सोडले होते. पाच वर्षांपूर्वी स्वातंत्र्यसनिक भरगंडे यांचा मृत्यू झाला आणि त्यांना मिळणारी पेन्शनही अचानक बंद झाली. मराठवाडय़ाच्या स्वातंत्र्यासाठी अनेकदा प्राणाची बाजी लावणाऱ्या भरगंडे यांच्या कुटुंबाची ५ वर्षांपासून परवड सुरू होती.
तुळजापूर तालुक्यातील सलगरा दिवटी या गावाचा मराठवाडा मुक्तिसंग्रामात मोठा वाटा आहे. येथील स्वातंत्र्यसनिक शिवराम भरगंडे यांचे नाव ऐकले तरी रझाकाराच्या काळजाचा थरकाप उडायचा. हैदराबाद संस्थान खालसा झाले आणि महाराष्ट्र सरकारने शिवराम यांना स्वातंत्र्यसनिकांची ७ हजार रुपये पेन्शन लागू केली. पाच वर्षांपूर्वी (२० नोव्हेंबर २०११) त्यांचे निधन झाले. त्यानंतर त्यांच्या पश्चात नियमानुसार हयात असलेल्या त्यांच्या पत्नीला स्वातंत्र्यसनिकाच्या पेन्शनचा लाभ मिळायला हवा होता. मात्र, मागील पाच वर्षांपासून सरकारदरबारी खेटे मारूनही या माऊलीच्या हातात कवडीदेखील पडली नाही.
सलग ४ वष्रे या वीरपत्नीने पाठपुरावा केल्यानंतर मृत स्वातंत्र्यसनिकाच्या पेन्शन मंजुरीचे पत्र जिल्हा कोषागार कार्यालयाने स्टेट बँक ऑफ इंडियाच्या तुळजापूर शाखेला दिले. शाखेने हे पत्र त्यांच्या मुख्य कार्यालयाला पाठवून दीड वर्ष सरले, तरीही अजून हिरकणाबाईंच्या पदरात दमडीही पडली नव्हती. सरकारने कोणत्याही स्थितीत पेन्शन थांबवू नका, असे आदेश जारी केले. हिरकणाबाई हयात आहेत, याचा पुरावा देण्यासाठी त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय, तहसील कार्यालय, नागपूरचे लेखा महापरीक्षक, बँकेची शाखा आणि जिल्हा कोषागार कार्यालयात ५ वष्रे चकरा मारल्या. त्यानंतर महिना ८ हजार रुपये पेन्शनच्या मंजुरीचे पत्र मिळाले. मात्र, ते मुंबईत लटकले होते. अॅड. एम. बी. माडेकर यांनी या बाबत प्रसिद्ध झालेल्या वृत्ताच्या आधारावरून भरगंडे यांचे वारस असलेले महावीर भरगंडे यांना पेन्शनसाठी सहकार्य केले. त्यांनी पाठपुरावा केल्यानंतर प्रशासनाने वृत्ताची दखल घेत डिसेंबर २०११ ते डिसेंबर २०१५पर्यंतचे महिना ८ हजार रुपयांप्रमाणे ४ लाख १६ हजार रुपये हिरकणाबाई भरगंडे यांच्या बँक खात्यावर जमा केले.
‘लोकसत्ता’चे आभार
पाच वर्षांपासून प्रशासनाकडे पाठपुरावा करूनही आईला न्याय मिळत नव्हता. आईच्या उपचारासह इतर खर्च भागवणे कठीण होते. वडील शिवराम भरगंडे यांना सरकारने पेन्शन सुरू केली. मात्र, ती निधनानंतर मिळत नसल्याने सतत शासकीय कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागत होते. या बाबतचे वृत्त ‘लोकसत्ता’मध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर त्याचे कात्रण हे पेन्शन मिळण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरले. त्यामुळे स्वातंत्र्यसनिक भरगंडे यांचा मुलगा महावीर यांनी ‘लोकसत्ता’चे आभार मानले.

Story img Loader