बिपीन देशपांडे

ग्रामीण भागातील मधुमेही मुलांची आजाराशी दोस्ती; ‘उडाण’ची साथ

‘‘दिवाळीत माझी साखर खूप वाढते म्हणून बाबा म्हणाले, घरात गोड-धोड काही करायचे नाही, म्हणून आईने फक्त चिवडा वगरे पदार्थच केले. पण दर रविवारी मी गोड खाते. त्याला आम्ही स्वीट संडे म्हणतो. चॉकलेट वगरे खाण्यापूर्वी शरीरातील साखर तपासून त्या प्रमाणात इन्सुलिन घेते. साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी दोरीवरच्या उडय़ाही मारते.’’

सातवीतील निशा गणेश थाबडे मोकळेपणाने सांगत होती. आठवीतील अभिजीतही निशाच्या बोलण्याला मान डोलवून होकार देत होता. अभिजीत, निशासारख्या १० ते २० वर्षांआतील मुलांकडे आपल्या शरीराला आता आवश्यक काय आणि किती प्रमाणात खायचे, याचे नियोजन आहे. मधुमेहाने त्यांना नियोजनपूर्वक जगण्याचे कौशल्य शिकवले. ही मुले त्याचा अभ्यासातही चपखलपणे वापर करताना दिसताहेत. चिंतेची बाब म्हणजे ग्रामीण भागातील मुलांनाही मधुमेह होत आहे.

औरंगाबादेतील ‘उडान’ ही संस्था ज्यांच्या शरीरात इन्सुलिन तयार होत नाही (टाईप-१) अशा मुलांसाठी काम करते. पालकांमधील मधुमेहाची भीती दूर करून अशा मुलांना हसत-खेळत जगण्याचे कौशल्य ही संस्था शिकवते. संस्थेत काम करणाऱ्या पूजा दुसाद यांच्या माहितीनुसार औरंगाबाद शहर, ग्रामीण भागासह लगतच्या जिल्ह्य़ांमध्ये ६०० पेक्षा अधिक मुले मधुमेहग्रस्त आहेत. ग्रामीण भागातील मुलांमध्ये प्रमाण वाढते आहे. मुलांपेक्षा त्यांच्या पालकांमध्ये आम्ही जागृती करतो. पूजा यांची लहान मुलीला मधुमेह आहे. संस्थेच्या प्रमुख डॉ. अर्चना सारडा यांनी काही समदु:खी महिलांना प्रशिक्षण देऊन ग्रामीण भागातील मुलांच्या पालकांमधील या आजाराबाबतची भीती दूर करण्यासाठी आमची मदर कोचेस म्हणून नियुक्ती केल्याचे दुसाद सांगतात.

सानिका वानखेडे खरे तर तंत्रशिक्षणची विद्यार्थिनी. पण तिनेही आता ‘उडान’च्या कामात झोकून दिले आहे. तिलाही मधुमेह आहे. दहा वर्षांपासून ती या आजाराशी सामना करते आहे. कमलेश चित्ते, संग्राम मेहेर, नकुल तिवारी, तुषार चव्हाण हे महाविद्यालयीन तरुणांना मधुमेह आहे. कमलेश आणि संग्राम सांगतात की, आम्ही आजाराला लपवत नाही, आता तर आमचे मित्रही आमची काळजी घेतात. इन्सुलिन घेतले की नाही, ते विचारतात. या आजारामुळे नियोजनबद्ध जगण्याचे कौशल्य शिकता आले. शरीराला एक प्रकारची सवयच लागली. त्याचा उपयोग अभ्यासाची तयारी करताना होतो. मस्त जगतो. वेगवेगळ्या स्पर्धामध्ये भाग घेतो. नुकतीच हैदराबादला एक जागतिक स्तरावरील परिषद झाली. त्यात आम्ही आमची कला सादर करून लोकांची मने जिंकली. या परिषदेत परदेशातील अडीच हजार तर भारतातील ५०० पेक्षा अधिक डॉक्टर सहभागी झाले होते.

मधुमेह झालेल्या ग्रामीण भागातील मुलांची काळजी घेण्याचे आव्हान आमच्या समोर आहे. पालकांमध्ये जागृती करावी लागते. अनेक पालकांकडे इन्सुलिन, औषधे घेण्याएवढेही पसे नसतात. रक्तातील साखर तपासणीच्या यंत्रासह औषधेही आम्ही पुरवतो. त्यासाठी काही दानशूरांची मदत घेतो. ग्रामीण भागात मधुमेही मुलांचे प्रमाण काहीसे चिंताजनक असले तरी या आजाराशी दोन हात करण्याचे कौशल्य आम्ही त्यांना शिकवतो.

– डॉ. अर्चना सारडा

Story img Loader