छत्रपती संभाजीनगर : गोदावरी नदीतून होणारा वाळूचा अवैध उपसा रोखण्यासाठी ३९ ठिकाणी स्थिर पथकांची उभारणी करण्याचा निर्णय महसूल व पोलीस विभागाने घेतला होता. मात्र, या पाहणी पथकांना निवारा, पंखे, पिण्याचे पाणी अशी सुविधा देण्यासाठी निधी नाही.बीडमधील वाळू उपशाबरोबरच पैठण येथूनही वाळूचा अवैध उपसा मोठ्या प्रमाणात होत असल्याच्या तक्रारी होत्या. या तक्रारीनंतर जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांनी संयुक्त तपासणी पथके गठित करण्याचे ठरविले होते.
वाळू उपसा ज्या भागातून होतो असे ३९ मार्गही प्रशासनाने शोधले. या प्रत्येक मार्गावर उभारणीसाठी स्थिर पथकेही स्थापन करण्याचा निर्णय घेतला. या पथकात महसूल व पोलीस दोन्ही विभागातील प्रामाणिक कर्मचारी निवडण्याची प्रक्रिया हाती घेण्यात आली. मात्र, वाळू वाहतूक मार्गावर निवारे उभे करण्यासाठी लागणाऱ्या निधीचा पेच असल्याचे सूत्रांनी सांगितले.
अवैध वाळू उपशाविरुद्ध कारवाई हाती घेतल्यानंतर काही जणांचे हितसंबंध दुखावले जात असल्याने कारवाई फारशी होत नसल्याचे सांगण्यात येते. दरम्यान रॉयलटीची रक्कम बांधकामांच्या परवानगीबरोबर भरून घेण्याच्या पर्यायावरही विचार केला जात आहे. वाळू संबंधी नवे धोरण आखले जात असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नुकतीच दिली होती. सध्या अवैध वाळू वाहतुकीला चाप लावण्यासाठी निधीची चणचण असल्याचे सांगण्यात येत आहे.