औरंगाबाद : सेवाग्रामच्या आश्रमात एक झोपडी कुष्ठरुग्णाची असायची. त्यातही नित्य जावून कुष्ठरुग्णाची अत्यंत श्रद्धेने महात्मा गांधी सेवा करायचे. गांधीजी स्वच्छतेबाबत किती जागरूक, याचे आचरणातून समोर ठेवलेले हे उदाहरण. या महात्म्याच्या औरंगाबादेतील पुतळ्याच्या परिसराची आजची स्थिती कशी तर विदारक. शुभोभीकरण तर सोडाच. पण रविवारी किंवा अन्य सुटीच्या दिवशीही स्वच्छतेसाठी कोणीही फिरकत नाही. शहागंजमधील पुतळा परिसराला लागूनच ऑटोरिक्षांचा तळ आहे. तेव्हा परिसरात ओढून फेकलेल्या सिगारेटची थोटकं, गुटख्याच्या फेकलेल्या पुडय़ा आणि खाल्ल्यानंतर मारलेल्या पिचकाऱ्या, असेच चित्र. स्वच्छ भारताचे स्वप्न दाखवलेल्या आणि त्याचा आचरणातून संस्कार घालून दिलेल्या महात्म्याच्या पुतळा परिसराचे हे आजचे चित्र.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शहागंज भागात गांधी चमन नावाने ओळखला जाणारा परिसर. तेथे महात्म्याचा संगमरवरी पूर्णाकृती पुतळा आहे. हातात काठी घेऊन उभ्या अवस्थेतील. जागेचा परिसर निमुळत्या आकारातील. या जागेत दोन मोठी झाडं. एक लिंबाचं तर दुसरे शोभेचे. इतर तीन-चार दोन-चार फुटांची शोभेची झाडं. खुडलेल्या अवस्थेतील. महात्म्याच्या पुतळ्याला कधी वाळून गेलेला एखादा हार कितीतरी दिवस गळ्यातच पडलेला असतो. पुतळा परिसराच्या साफसफाईची जबाबदारी महानगरपालिकेच्या स्वच्छता विभागाकडे. त्यातही बगिचाची देखभाल पाहणाऱ्या यंत्रणेकडे. दर दिवशी किंवा आठवडय़ाला एखाद्या महिलेला गांधी पुतळ्याची साफसफाई करण्याचे काम सांगितले जाते. खराटय़ाने झाड-झुड करून चार-दोन झाडांच्या बुंध्याजवळची खुरपणीचे काम ती महिला करते. रविवारी पुतळ्याची साफसफाई करण्यासाठी कोणीही फिरकले नाही. सोमवारी एक महिला आली होती. ती म्हणाली, आज इकडचे काम दिले मला. झाड-झुड-खुरपणी केले. परवा काही वेळ आले पण आज प्रथमच साफसफाई करतेय. नंतर एक पर्यवेक्षक आला. त्याला स्वच्छतेच्या कामाविषयी विचारले. तो म्हणाला, ‘‘रविवारी हे काम केले जात नाही. आता उद्या गांधी जयंती असल्यामुळे दुपारी अग्निशमनवाले येऊन पुतळा धुवून काढतील. मध्यंतरी विद्युत दिव्यांच्या आड झाडांच्या फांद्या यायच्या. त्या आम्ही कापून काढल्या.’’ पण आताही गांधी पुतळ्यावर पूर्ण प्रकाश पडण्यासारखी परिस्थिती नाही. तेथील लिंबाच्या झाडांच्या फांद्या आडव्या येतात. देशात अनेक ठिकाणी गांधी विचाराने भारावलेल्या जनांकडून महात्म्याच्या पुतळा परिसराची काळजी घेतली जाते. अनेक जण स्वत सेवाभाव विचाराने आणि निष्ठेने पुतळा परिसर स्वच्छ करतात. औरंगाबादेत मात्र स्वच्छतेलाही सुटीच्या दिवशी फाटा दिला जातो.

Aurangabad News (छत्रपती संभाजीनगर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gandhi statue not clean on sunday in aurangabad
Show comments