जिल्ह्यात ठिकठिकाणच्या मंडळांनी ढोलताशांच्या गजरात गणरायाला भक्तिभावाने निरोप दिला. शहरातील चिंतामणी गणरायाच्या दर्शनास राज्याच्या विविध भागांतील भाविकांनी गर्दी केल्यामुळे काही बाप्पांचा मुक्काम एक दिवसाने वाढला. सोमवारी त्यांचे विसर्जन करण्यात आले.
जिल्ह्यात १ हजार १८६ मंडळांनी ‘श्रीं’ची स्थापना केली होती. यंदा जिल्ह्यात दुष्काळी स्थिती असल्याने काही गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी उत्सवावरील खर्चाला कात्री लावली, तर काही मंडळांनी प्रसादावर अधिक भर दिला. शहरात प्रमुख रस्त्यांवरील वाहतूक रविवारी पूर्ण बंद ठेवून केवळ चिंतामणीच्या दर्शनासाठी आलेल्या भक्तांच्या रांगा या रस्त्यावर लागल्या होत्या. अनेक दात्यांनी शहरात आलेल्या भक्तांच्या फराळ, पाणी, चहाची मोफत व्यवस्था केली होती. शहरात यंदा प्रथमच चिंतामणीच्या दर्शनासाठी भाविकांनी दोन दिवस गर्दी केली होती. जिल्ह्यातील बहुसंख्य मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी ‘श्रीं’ची मिरवणूक ढोलताशाच्या गजरात काढून मूर्तीचे विसर्जन केले. मात्र, शहरातील चिंतामणीच्या दर्शनास आलेल्या भाविकांच्या गर्दीमुळे प्रमुख रस्त्यांवरील रहदारी बंद केल्याने गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांना ‘श्रीं’ची विसर्जन मिरवणूक काढता आली नाही. शहरातील १०१ पकी ७६ मंडळांनी श्रींच्या मूर्तीचे विसर्जन केले. शहरातील २३ व औंढा नागनाथ येथील १ अशा २४ मंडळांच्या मूर्तीचे विसर्जन सोमवारी संध्याकाळपर्यंत करण्यात आले. सर्वत्र चोख पोलीस बंदोबस्त होता.
हिंगोलीत गणरायाला निरोप, खर्चाला कात्री, प्रसादावर भर!
यंदा जिल्ह्यात दुष्काळी स्थिती असल्याने काही गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी उत्सवावरील खर्चाला कात्री लावली, तर काही मंडळांनी प्रसादावर अधिक भर दिला.
Written by दया ठोंबरे
First published on: 29-09-2015 at 01:47 IST
Aurangabad News (छत्रपती संभाजीनगर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ganesh immersion