गणेश मंडळाच्या वर्गणीतून अनावश्यक उत्सवी खर्च करण्यापेक्षा दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या बांधवांना मदत करण्यास पुण्यातील गणेश मंडळाचे कार्यकत्रे सरसावले आहेत. श्री चिंतामणी ग्रुप व श्री साईबाबा मंदिर मंडळांच्या वतीने उस्मानाबाद जिल्ह्यातील निराधार आणि आत्महत्याग्रस्त १०० कुटुंबांना अन्नधान्याच्या माध्यमातून मदतीचा हात पुढे केला जाणार आहे.
जिल्ह्यात ४ वर्षांपासून दुष्काळाने मुक्काम ठोकला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी, शेतमजूर व शेतीशी निगडीत व्यावसायिकांची आर्थिक कोंडी झाली आहे. यातून मागील ९ महिन्यांत ११३जणांचा कर्जबळी गेला. एकीकडे दुष्काळाच्या झळा सहन करीत संकटात अडकलेला शेतकरी आणि दुसरीकडे उत्सवाच्या नावाखाली लाखो रुपयांची उधळपट्टी असे विरोधाभासी चित्र असताना पुण्यातील गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी पुढे येत नवा आदर्श घालून दिला.
जिल्ह्यातील निराधार, आत्महत्याग्रस्त, शेतमजूर, विधवा, परित्यक्ता अशा आíथक विवंचनेत अडकलेल्या १०० कुटुंबीयांना या मंडळांच्या वतीने किमान दोन महिने पुरेल एवढे अन्नधान्य, किराणा सामान तसेच ब्लँकेट वाटप केले जाणार आहे. अन्नधान्याबरोबरच शेतकऱ्यांच्या दावणीला असलेल्या जनावरांना मंडळांतील कार्यकत्रे चारावाटप करणार आहेत. उद्या (गुरुवारी) सकाळी १० वाजता सारोळा येथे तेर, तावरजखेडा, कामेगाव, पानवाडी, म्होतरवाडी परिसरातील ३८ लाभार्थ्यांना मदतीचे वाटप केले जाणार आहे. त्यानंतर रुईभर येथे उस्मानाबाद, बेंबळी, केशेगाव परिसरातील ३२ लाभार्थ्यांना मदत देण्यात येईल. यानंतर लोहारा तालुक्यातील वडगाव, बेंडकाळ, धानुरी, सास्तूर आणि लोहारा परिसरातील गरजूंना लोहारा, तसेच तुळजापूर तालुक्यातील दहिटणा येथील १३ लाभार्थ्यांनाही मदत दिली जाणार आहे.

Story img Loader