अनेक सुशिक्षित बेरोजगारांना फसवले

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

औरंगाबाद : विमान प्राधिकरणात सरकारी नोकरी लावून देण्याचे छोटय़ा जाहिरातीद्वारे आमिष दाखवून ५०० ते ६०० सुशिक्षित बेरोजगारांना फसवणारी टोळी औरंगाबाद ग्रामीण पोलिसांच्या सायबर सेल शाखेने जेरबंद केल्याची माहिती बुधवारी दिली. याप्रकरणी कन्नड तालुक्यातील औराळा येथील तरुण शेतकरी रामदास तातेराव खवळे यांनी आपल्या दोन भाचांना फसवल्याच्या संदर्भाने वैजापूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यावरून केलेल्या तपासात तौफिक हानिफ पटेल हा पोलिसांच्या हाती लागला. त्याच्याकडून सर्व आर्थिक व्यवहार हा वसई येथील सचिन उर्फ अजयसिंह व त्याची पत्नी हे दोघे महाराष्ट्रासह गुजरात, गोवा, मध्यप्रदेश आदी राज्यांमध्ये वर्तमानपत्रात छोटय़ा जाहिराती देऊन बेरोजगारांची फसवणूक करीत असल्याचे समोर आले. अजयसिंह हा वसई येथील रहिवासी असून तेथील आनंदनगरात त्याचे एस. एस. एंटरप्राइजेस प्रॉपर्टी सोल्यूशन नावाचे दुकान आहे. तो पूर्वी मालमत्ता खरेदी-विक्रीच्या व्यवसायात दलाल म्हणून काम करायचा. त्याने पत्नीच्या साथीने घरबसल्या कमवा व शिका, विमान प्राधिकरणात नोकरी मिळणार असल्याच्या जाहिराती वर्तमानपत्रात दिल्या होत्या. तर तौफिक पटेल हा बीडचा रहिवासी असून सध्या तो कांदिवली क्रीडा प्रबोधिनीत खेळाडू म्हणून राहतो आहे. सुशिक्षित बेरोजगारांना फसवताना बीड येथील खात्यात व सांताक्रूझ, वडाळा, माझगाव, वसई येथील बँकांमध्ये पैसे जमा करण्याचे सांगण्यात येत होते. रामदास तातेराव खवळे यांनी त्यांच्या बहिणींच्या मुलांना आरोपींनी नोकरीच्या आमिषाने फसवत सुरुवातीला दोन हजार, पुन्हा कपडे, बुटासाठी साडेसात हजार व अन्य काही ठिकाणांचे मिळून भाचांकडून ३० हजार ५०० रुपये घेतल्याची तक्रार दाखल केल्यानंतर  ग्रामीण पोलिसांच्या सायबर सेलच्या पथकाने शोध घेतला असता ते तौफिक पटेल व अजयसिंह यांच्यापर्यंत पोहोचले. त्यांच्याकडून ५०० ते ६०० जणांना फसवून एक कोटी रुपये घेतल्याची माहिती समोर आली. आरोपींकडून सहा एटीएम कार्ड, तीन मोबाइल ज्यात सहा सीमकार्ड, दोन लॅपटॉप, दोन हेडफोन आदी साहित्यही मिळून आले आहे.