औरंगाबाद : कन्नड तालुक्यातील एका लहानशा गावातील १७ वर्षीय मुलीवर सहा जणांनी वारंवार अत्याचार केल्याची घटना १३ ऑगस्ट रोजी कन्नड ग्रामीण पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे. या प्रकरणी पीडितेच्या आईने पोलिसांना घडलेल्या घटनेची माहिती दिली. या घटनेनंतर आणि उद्यापासून सुरू होणाऱ्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर औरंगाबाद ग्रामीणचे पोलीस प्रशासन चांगलेच हादरलेले असून पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया यांच्यासह उपविभागीय अधिकारी, सहायक पोलीस निरीक्षकांनी घटनास्थळ असलेल्या गावाला भेट देऊन आढावा घेतला. तसेच मंगळवारी उच्चपदस्थ पोलीस अधिकाऱ्यांच्या बैठकांचेही सत्र सुरूच होते. पोलीस उपविभागीय अधिकारी मुकुंद आघाव, सहायक पोलीस निरीक्षक भालेराव यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी बैठकांमध्ये असल्याचे सांगितले.
हेही वाचा >>> साडेचार महिन्यांच्या मुलासह पत्नीचा विहिरीत ढकलून खून ; शिरूर तालुक्यात सापडलेल्या मृतदेहांचे गूढ उकलले
या प्रकरणी एका अल्पवयीन मुलासह सहा जणांना अटक करण्यात आली असून कन्नड जिल्हा न्यायालयाने आरोपींना १७ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. किरण साहेबराव गोंडे, अरुण कैलास दरेकर, श्रीकांत अशोक जाधव, गोविंद नेमीचंद शेळके, सौरभ जगन जाधव, अशी आरोपींची नावे आहेत. या घटनेवर पोलीस अधिक भाष्य करत नसल्याने प्रकरणाची गांभीर्यता वाढल्याचे दिसून येत आहे. शेतमजूर आई-वडिलांची मुलगी असलेली १७ वर्षीय पीडिता ही करोनापूर्व काळात चापानेर येथे शिक्षण घेत होती. मात्र, करोनानंतर नववीनंतरचे शिक्षण अर्धवट सोडून ती गावात राहूनच मजुरी करून आई-वडिलांना हातभार लावत होती.
– पाच आरोपींना अटक
कन्नड तालुक्यातील सामूहिक बलात्काराच्या घटनेत पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली आहे. एक मुलगा अल्पवयीन असून त्याची बालसुधारगृहात रवानगी केलेली आहे. घटनेचा बारकाईने तपास करण्यात येत आहे. – मनीष कलवानिया, पोलीस अधीक्षक.